Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

अलिशान कारमधून गोधन चोरणारे पोलिसांना गुंगारा देवून पसार
वणी, १५ ऑगस्ट / वार्ताहर

गायीला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन नंतर तिला अलिशान इनोव्हा मोटारीमध्ये पळविताना वणी व दिंडोरी पोलिसांच्या हातावर तूरी देवून चोरटे पसार झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.

 

चोरीसाठी वापरलेल्या पद्धतीने पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे.
गावातील महावीर पथावरील जैन मंदिरालगत रात्री तीनच्या सुमारास इनोव्हा गाडीतून तीन ते चार जण खाली उतरले. त्यांनी येथे पहुडलेल्या गायीस पकडून गुंगीचे इंजेक्शन देत पाय बांधले आणि नंतर तिला गाडीच्या मागील डिकीत टाकले. यावेळी झालेल्या आवाजाने शेजारच्या नागरिकास जाग आली व त्याने वणी पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. पण, पोलिसांनी गावाबाहेरील जैन मंदिर असे ऐकून बसस्थानकालगतच्या मंदिराकडे धाव घेतली. तेथेही एक इनोव्हा आढळून आली, पण, त्यात संशयास्पद असे काही आढळले नाही. याच दरम्यान चोरटय़ांनी गाडी गावाबाहेर आणून दिंडोरी रस्ता धरला. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी मोटारीचा पाच किलोमीटर पाठलाग केला. परंतु, चोरटय़ांची गाडी हाती न लागल्याने याची माहिती दिंडोरी पोलिसांना वायरलेसवरून देण्यात आली. या घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता दिंडोरी पोलिसांनी एका कर्मचाऱ्याला रस्त्यावर थांबविले, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. या पोलिसाने थांबण्याचा दिलेल्या इशाऱ्याला न जुमानता चोरटय़ांनी कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालून पळ काढला. नंतर याची माहिती पंचवटी पोलिसांनाही कळविण्यात आली. तथापि, दिवस उजाडून गेल्यानंतरही गाय घेऊन पळालेली इनोव्हा काही पोलिसांना सापडू शकली नाही. गावात आधी तपासणी केलेली इनोव्हा देखील गायब झाली आहे.