Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

‘फर्निक्युलर ट्रॉली’ उपक्रम वणीचा नावलौकीक वाढविणार - छगन भुजबळ
वणी, १५ ऑगस्ट / वार्ताहर

देशात प्रथमच सप्तश्रृंग गडावर होत असलेला फर्निक्युलर ट्रॉलीचा उपक्रम या भागाचा नावलौकीक

 

वाढविणार असून भाविक, पर्यटक व स्थानिक व्यावसायिकांसाठी तो महत्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. सप्तश्रृंग गडावर फर्निक्युलर ट्रॉलीच्या प्रकल्पाचे भूमीपूजन आज भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. ए. टी. पवार, सरपंच जगन बर्डे आदी उपस्थित होते. सप्तश्रृंग गडाशी आपले ४० वर्षांपासून नाते आहे. पूर्वी गडावर जाण्यास बसगाडय़ा नव्हत्या. तेव्हा पायी येवून दर्शन घ्यावे लागत असे. परदेशातील दौऱ्यात यासारखी ट्रॉली पहावयास मिळाली होती. तेव्हाच सप्तश्रृंग गडावर असा उपक्रम राबविण्याची कल्पना मनात आली होती. कारण, वृद्ध व अपंग भाविक आणि लहान मुलांनाही देवीच्या दर्शनाची तीव्र इच्छा असते. तथापि, ५०० पायऱ्या चढणे काही भाविकांना अवघड जाते. या नवीन अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून अतिशय कमी वेळात म्हणजे एका तासात १२०० भाविक देवीचे दर्शन घेऊ शकतील असे भुजबळ यांनी सांगितले. सुमारे ३० कोटीचा हा प्रकल्प संपूर्णत खासगीकरणातून राबविला जाणार आहे. त्यामध्ये स्थानिक व्यवसायिक व युवकांनाही प्राधान्य दिले जाईल, असे भुजबळ यांनी सांगितले. सप्तश्रृंग गड, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी धार्मिक स्थळांच्या विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे. सप्तश्रृंग गडावर दरड कोसळल्याने प्रतिबंधात्मक उपाय व भाविकांच्या सुखसोयी, परिसराच्या विकासासाठी त्याचे नियोजन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. खा. चव्हाण यांचेही यावेळी भाषण झाले.