Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

वैजापूर विधानसभेची जागा लढविण्यावरून खलबते खासदार गोविंदराव आदिक यांची काँग्रेसजनांशी भेट
औरंगाबाद, १५ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीत वैजापूरची जागा कोणी लढवायची यावरून जोरदार खलबते सुरू झाली आहेत. गेल्या वेळी ही जागा काँग्रेसने लढविली होती. पण आता या जागेवर राष्ट्रवादी

 

काँग्रेसने दावा केला आहे. काँग्रेसच्या वैजापूरमधील स्थानिक नेत्यांची आणि इच्छुक उमेदवारांची भेट राष्ट्रवादीत नुकतेच गेलेले खासदार गोविंदराव आदिक यांनी घेतली. या बैठकीपासून राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना दूर ठेवण्यात आले होते.
वैजापूर विधानसभा मतदारसंघातून गोविंदराव आदिक हे १९८० मध्ये निवडून गेले होते. त्यामुळे वैजापूर तालुक्यामध्ये त्यांना मानणारे आणि अनुयायी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात आहेत. खासदार आदिक हे लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत दाखल झाले. ते काँग्रेसमध्ये असताना वैजापूरच्या काँग्रेसवर आदिक गटाचीच छाप होती. या गटाचेच अनेक स्थानिक नेते त्यांचे समर्थक आहेत.
गोविंदराव आदिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेवर पाठविले आहे. आपल्या राजकीय कारकीर्दीत या मतदारसंघाशी असलेले नाते गोविंदराव आदिक यांनी कधीही तोडले नाही. या तालुक्यातील कार्यकर्त्यांशी जवळीक ठेवली आहे. त्यांच्याशी नाते जपले आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावा यासाठी खासदार गोविंदराव आदिक हे प्रयत्न करत आहेत.
या जागेचा तिढा सोडविण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी खासदार आदिक यांच्यावर सोपविली आहे. खासदार आदिक यांनी आपल्या वैजापूरच्या बैठकीत काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांशी सविस्तर चर्चा केली. राष्ट्रवादीचे वैजापूरमधील स्थानिक नेते काँग्रेसच्या नेत्यांना जुमानत नाही अशी तक्रारही काँग्रेस नेत्यांनी खासदार आदिक यांच्याकडे केली.
वैजापूरमधील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या निवासस्थानी ही बैठक झाली. राष्ट्रवादीचे माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर, गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांना या बैठकीपासून लांब ठेवण्याची खबरदारी घेण्यात आली होती.
काँग्रेसच्या अंतर्गत भांडणाचा फायदा या मतदारसंघात शिवसेनेला झालेला आहे. या मतदारसंघावर शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केलेले आहे. शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का लावण्यासाठी आणि हा बालेकिल्ला ढासळण्यासाठी गोविंदराव आदिक यांनी वैजापूरमधील दोन्ही काँग्रेस नेत्यांत दिलजमाई घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.