Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

मालेगाव व नाशिकला उपमुख्यमंत्र्यांची भेट
नाशिक, १५ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

मालेगावातील कॉलरा साथ तसेच नाशिकमधील स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव या पाश्र्वभूमीवर उपमुख्यमंत्री तसेच नाशिक जिल्ह्य़ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज जिल्हा शासकीय

 

रुग्णालय व मालेगावचे सामान्य रुग्णालय येथे भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, धुळ्यामध्ये कार्यान्वित झालेल्या स्वाईन फ्लूच्या विशेष कक्षात एकूण आठ संशयित रुग्ण दाखल झाले असून त्यापैकी एक जण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर तेथेही खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
मालेगावातील अतिसार तसेच कॉलरा साथ सध्या नियंत्रणात असून पालिका प्रशासनाने शहरात मोठय़ा प्रमाणात स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. जंतूनाशक औषधांची फवारणी, तुंबलेल्या गटारी स्वच्छ करणे यासारख्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज मालेगावी भेट देवून पालिकेच्या रुग्णालयासह सामान्य रुग्णालयात जावून रुग्णांची विचारपूस केली. पालिकेने शहरातील स्वच्छतेबाबत कठोर पावले उचलून येत्या दोन त्यादृष्टीने सकारात्मक भूमिका पार पाडावी अशी तंबी भुजबळांनी प्रशासनाला दिली. त्या अगोदर त्यांनी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात जावून स्वाईन फ्लू रुग्णांसाठी कार्यान्वित विशेष कक्षाची तसेच तेथे केल्या जाणाऱ्या उपचारांविषयी यंत्रणेकडून माहिती घेतली.दरम्यान, धुळ्यातील विशेष कक्षात आतापर्यंत आठ संशयित रुग्ण उपचारार्थ दाखल झाले आहेत. त्यापैकी एकाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून ती विद्यार्थिनी असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सजग झाली आहे. सर्व रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचेही आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.