Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

तुळजापूर क्षेत्र विकास योजना अंमलबजावणीत राजकारणी-उपद्रवी प्रवृत्तींचा उपसर्ग?
तुळजापूर, १५ ऑगस्ट/वार्ताहर

तुळजापूर क्षेत्र विकासासाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या ३१५ कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात ८४ कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिल्याने एकीकडे शासकीय यंत्रणा आता

 

कायदेशीर सोपस्काराची पूर्ती करून या योजनेची अंमलबजावणी त्वरेने करण्यासाठी हालचाली करीत आहे. तर दुसरीकडे स्थानिक नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक तसेच शहर नियोजन कार्यालयातील दोन अधिकारीवर्गाचा अंतर्भाव असणाऱ्या गठीत समितीने दाखल आक्षेपांधारे तसेच शहर स्तरावर गठीत समिती सदस्य व व्यापारी मंडळींच्या वतीने प्रस्तावित आराखडय़ात काहीसा बदल करण्याच्या दृष्टीने होणाऱ्या हालचालीस वेग आल्याने प्रस्तावित क्षेत्र विकास योजनेस राजकीय वर्तुळातील काही उपद्रवी प्रवृत्तींचा उपसर्ग पोहोचण्याची शक्यता बोलली जात आहे व त्याची चर्चाही जोरावर आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या आठ-दहा दिवसांत लागू होण्याची शक्यता असल्याने या क्षेत्र विकास योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यासाठी काँग्रेसची नेते मंडळी प्रयत्नशील आहेत. निवडणूकपूर्व काळात वातावरणनिर्मितीसाठी तसेच श्रेय पदरात पाडून घेण्यासाठी मराठवाडा वैधानिक मंडळाचे अध्यक्ष आमदार मधुकरराव चव्हाण ही संधी सोडणार नाहीत. मात्र क्षेत्र विकास योजनेमुळे रस्तारुंदीकरणासाठी व अन्य कारणांसाठी ज्यांच्या ज्यांच्या भर रस्त्यावर व मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा संपादित केल्या जाणार आहेत अशा मातब्बर मंडळींनी प्रस्तावित आराखडय़ात थोडाफार बदल करून आपल्या जागेपैकी काही क्षेत्र वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न करतानाच त्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावल्याचे ऐकीवात आहे व याच धूर्त हेतूने जमीन संपादन पूर्वप्रक्रि येत व कायदेशीर सोपस्कार पूर्वीच्या कामकाजात थोडाफार अडसर निर्माण करण्याचे प्रयोजन मांडल्याची चर्चा आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते मंडळी दरम्यान आघाडी करण्याबाबत विद्यमान आमदारांना शह देण्यासाठी शिवसेना-भाजपा तसेच तिसऱ्या आघाडीद्वारे आपापले उमेदवार रिंगणात उतरविण्याच्या दृष्टीने हालचाली होत आहेत. या राजकीय हालचालीचेही पडसाद आता क्षेत्र विकास योजनेच्या शुभारंभ प्रक्रियेवर पडत असल्याचे दिसून येते. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या पाठबळावर (शेकाप-काँग्रेसच्या बंडखोर नगरसेविका) भारती गवळी यांनी नगराध्यक्षपदाची खुर्ची काबीज केली तर शेकाप-काँग्रेस युतीचे उमेदवार गंगणे यांना पराभवास सामोरे जाण्याची वेळी त्या पाठोपाठ नगरसेवक नागनाथ शिंदे यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठी झालेल्या पोटनिवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने पडणारा कौल लक्षात घेऊन स्थानिक स्तरावरही राजकारणाची समीकरणे बदलली असावीत व यासंदर्भातील कानमंत्र जिल्हास्तरावर व शासनात उच्च पदावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळींकडून मिळत असावा, अशीही चर्चा ऐकावयास मिळते. दरम्यान, क्षेत्र शहर विकास योजनेच्या कामी गठीत समितीतील एका नगरसेवकाची बैठक झाली अन् दुसऱ्या नगरसेविकोचा अंतर्भाव करण्याचा ठराव संमत केला गेल्याचीही चर्चा आहे. या झालेल्या बदलाचा संबंधही स्थानिक राजकारणाशी जोडला जातो आहे.