Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

मुख्याधिकारी धक्काबुक्की प्रकरणी तीन आठवडय़ांत निर्णय
उच्च न्यायालयाचा आदेश
इचलकरंजी, १५ ऑगस्ट/वार्ताहर

तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते जयवंत लायकर, विरोधी गटनेते सुरेश हाळवणकर व संभाजी नाईक या तिघांवरील कारवाईबाबत नगरविकास सचिव

 

मनुकुमार श्रीवास्तव यांनी तीन आठवडय़ांत निर्णय द्यावा, असा आदेश उच्च न्यायालयाचे न्या. ताहिल रामाणी व न्या.बिलाल नाजकी यांनी गुरुवारी दिला, तर साताऱ्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी सात फुटीर नगरसेवकांना अपात्र ठरवण्याबाबत काँग्रेसचे पक्षप्रतोद अशोक आरगे व बांधकाम सभापती रवि रजपुते यांच्या तक्रारअर्जातील वैधतेला दिलेले आव्हान फेटाळून लावले. त्यामुळे या प्रकरणातील खऱ्या कायदेशीर लढय़ाला सुरुवात झाली असून, पुढील सोमवारी सुनावणीचे काम देशमुख यांच्यासमोर चालणार आहे.
फेब्रुवारी २००७ मध्ये झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेवेळी तत्कालीन मुख्याधिकारी दीपक पाटील यांना विरोधकांकडून धक्काबुक्की झाली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल नगरविकास सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना तीन आठवडय़ांत घ्यावा, असा आदेश दिला. श्रीवास्तव यांच्या निकालाविरुद्ध अपील करण्यास दोन आठवडय़ांची मुदत उच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे आणखी सव्वा महिन्यानंतर या वादग्रस्त प्रकरणावर पडदा पडण्याची चिन्हे आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने उपरोक्त आदेश दिल्यानंतर शहरवासीयांचे लक्ष साताऱ्याकडे लागले होते. रात्री जिल्हाधिकारी देशमुख यांनी तांत्रिक मुद्दय़ाबाबतचा निकाल आरगे व रजपुते यांच्या बाजूने दिला. आरगे व रजपुते यांच्या तक्रारअर्ज प्रतिज्ञापत्र, साक्षांकन, स्वाक्षरी याशिवाय आहे. हा तांत्रिक दोष पाहता त्यांचा अर्ज अवैध ठरवावा, असा युक्तिवाद सात फुटीर नगरसेवकांच्या वकिलांनी केला होता. आरगे यांचा एक अर्ज अशा तांत्रिक कारणामुळे रद्दबातल ठरवला होता. त्यामुळे आरगे व रजपुते यांचा दुसरा अर्ज वैध ठरतो की, युद्धापूर्वीच काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागतो यावरून गेल्या आठवडाभरापासून जोरदार चर्चा सुरू होती.
तथापि विकास देशमुख यांनी आरगे व रजपुते यांच्या अर्जात सकृतदर्शनी दोष नसल्याचे स्पष्ट करून कायदेशीर दावा चालवणे योग्य ठरणार असल्याचा निकाल दिला.