Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

पुण्यातील स्थितीत सुधारणा
पुणे, १५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये ‘स्वाइन फ्लू’ने धुमाकूळ घातला असला, तरी आता परिस्थितीमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसते आहे. शनिवारपासून आज संध्याकाळी उशिरापर्यंत

 

‘स्वाइन फ्लू’मुळे कोणीही दगावले नाही. त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतही घट होत असल्याने पुणेकरांसाठी आशादायक चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, एक वर्षांच्या बालकासह तीन रुग्णांची प्रकृती अद्यापही गंभीर असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
एक आठवडय़ापासून पुण्यामध्ये झपाटय़ाने पसरलेल्या ‘स्वाइन फ्लू’मुळे शहरात अघोषित संचारबंदी असल्याची परिस्थिती अद्यापही आहे. ‘स्वाइन फ्लू’ने आजपर्यंत शहरात बाराजणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवापर्यंत रोजच मृतांची व पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. ‘स्वाइन फ्लू’चा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील प्रमुख दहीहंडीचे कार्यक्रमही काल रद्द करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरातील शाळा, महाविद्यालये, मॉल्स, मल्टिप्लेक्स आदींसह काही व्यापाऱ्यांनीही त्यांची दुकाने बंद ठेवली आहेत. मात्र, कालपासून परिस्थितीमध्ये झपाटय़ाने सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. काल एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्याचप्रमाणे आज संध्याकाळी उशिरापर्यंतही कोणी दगावले नव्हते. त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह रुग्णांनी संख्याही घटत असल्याने ‘स्वाइन फ्लू’ची भीती काही प्रमाणात दूर होण्यास मदत होत आहे. आजही शहरातील सर्व केंद्रांवर संशयित रुग्णांची तपासणी सुरू होती. जिल्ह्य़ात ‘स्वाइन फ्लू’च्या २७ हजार ३०८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात ५८ संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबतचा अहवाल आज राष्ट्रीय विषाणू संस्थेने दिला. त्याचप्रमाणे उपचार घेऊन पूर्णपणे बऱ्या झालेल्या ५० रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. तपासणीमध्ये संशयित आढळलेल्या १३४४ रुग्णांना तातडीने टॅमिफ्लूच्या गोळ्यांचा डोस सुरू करण्यात आला आहे. संशयित रुग्णांना तात्काळ टॅमिफ्लूच्या गोळ्यांचा डोस देणे व नागरिकांना एकमेकांशी कमीतकमी संपर्क येईल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने ‘स्वाइन फ्लू’चा धोका कमी होत असल्याचे आशादायक चित्र आहे. शहरामध्ये ‘स्वाइन फ्लू’ आटोक्यात येत असल्याची सध्याची चिन्हे असली, तरी ग्रामीण भागामध्ये ही साथ पसरण्याच्या धोका लक्षात घेता नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात सध्या तीन रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. त्यांनी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दोघांवर ससून रुग्णालयात, तर एकावर सह्य़ाद्री-मुनोत रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिघांचीही प्रकृती संध्याकाळी उशिरापर्यंत गंभीर परंतु स्थिर होती.