Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

नगरच्या पाटबंधारे विभागांना वाली कोण?
महेंद्र कुलकर्णी, नगर, १५ ऑगस्ट

कधी काळी राज्याचे पाटबंधारे खाते म्हणजे नगर अशीच राज्य सरकारमध्ये नगर जिल्ह्य़ाची

 

ओळख होती. ती मागेच पुसली गेली. आता तर या खात्याचे जिल्ह्य़ातील अस्तित्वच संपुष्टात येऊ लागले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या जिल्ह्य़ाचे तीन प्रतिनिधी असले, तरी पाटबंधारे विभाग मात्र जिल्ह्य़ात खंबीर आधाराच्या प्रतीक्षेत आहे.
पाटबंधारे विभागाचे नगर जिल्ह्य़ातील एकेक विभाग इतरत्र स्थलांतरित करण्याची नवीच टूम राज्याच्या स्तरावर आली आहे. मागच्या काही वर्षांत जिल्ह्य़ातील पाच वेगवेगळे विभाग स्थलांतरित झाले, तर तीन विभाग बंदच करण्यात आले. आता आणखी दोन विभाग स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. जिल्ह्य़ातील तिन्ही मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना त्याचे फारसे सोयरसूतक नसले, तरी हे षङयंत्र हाणून पाडण्यासाठी आता कर्मचारीच कंबर कसण्याच्या पवित्र्यात आहेत. शेतीच्या पाणीवाटपात पुण्याची ‘दादा’गिरी नगर जिल्ह्य़ाला नवी नाही. राजकीय वजन वापरून नगरचे हक्काचे पाणी पुण्यातील नेते तिकडेच अडवितात. आता उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येथील कार्यालये पळविण्याचा उद्योग सुरू केला आहे.
अगदी सुरुवातीला बी. जे. खताळ, नंतर आबासाहेब निंबाळकर, रामराव आदिक, गोविंदराव आदिक, अण्णासाहेब म्हस्के व नजीकच्या काळात सध्याचे कृषिमंत्री बाळासाहेब थोरात अशा नगर जिल्ह्य़ातील सहा लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत राज्याच्या पाटबंधारे खात्याची मंत्री म्हणून धुरा वाहिली. राज्याचे पाटबंधारे खाते सर्वाधिक काळ नगर जिल्ह्य़ाकडेच होते. एवढेच नाही, तर राज्याचे पाटपाणी धोरण आखण्यात सुरुवातीच्या काळात कॉम्रेड दत्ता देशमुखांच्या रूपाने नगर जिल्ह्य़ानेच मोठे योगदान दिले. आता मात्र येथील कार्यालये वाचवण्याचीही धमक जिल्ह्य़ात राहिली नसल्याचेच दिसते. पाटबंधारे खाते (सध्याचे जलसंपदा) नगर जिल्ह्य़ाकडे नसले, तरी कृषी (बाळासाहेब थोरात), शालेय शिक्षण (राधाकृष्ण विखे) व वन (बबनराव पाचपुते) अशी तीन खाती जिल्ह्य़ाकडे आहेत. तिघेही कॅबिनेट मंत्री म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात कार्यरत आहेत.
भंडारदरा जलविद्युत विभाग (सुरुवातीला नाशिक व आता थेट सातारा), रोहयो विभाग (नगरहून जळगावला), ऊध्र्व प्रवरा विभाग (नगरहून संगमनेरला), लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (नगरहून नाशिकला) असे चार विभाग मागच्या काही वर्षांत नगरहून हलविण्यात आले. कुकडी लाभक्षेत्र विकास तर बंदच करण्यात आला आणि आता मध्यम प्रकल्प विभाग (नगरहून विदर्भात भंडाऱ्याला), तर लघु पाटबंधारे प्रकल्प विभाग (नगरहून पंढरपूरला) स्थलांतरित करण्याचे घाटत आहे.
याशिवाय नारायणगाव कुकडी पाटबंधारे विभाग, श्रीगोंदे कुकडी पाटबंधारे विभाग आणि नगरचा कुकडी प्रकल्प भूविकास विभाग हे पूर्वी नगर मंडळांतर्गत कार्यरत होते. मात्र, पुणे कडा विभागाला जोडण्यात आले आणि नगरचा विभाग बंद करून हे कार्यालय नाशिकला जोडण्यात आले. खरंतर कुकडीच्या लाभक्षेत्रातील एकूण १ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सर्वाधिक म्हणजे ८५ हजार हेक्टर क्षेत्र एकटय़ा नगर जिल्ह्य़ातील आहे. तरीही येथील कार्यालयाचा वरीलप्रमाणे खेळ करण्यात आला.
नगर येथे कार्यरत असलेल्या स्थानिक स्तर विभागाचा द्राविडी प्राणायाम तर अत्यंत अनाकलनीय आहे. त्याचे विभागीय कार्यालय नगरला, मंडळ कार्यालय नाशिकला, मुख्य अभियंता कार्यालय पुण्याला आणि त्या महामंडळाचे कार्यालय औरंगाबादला आहे.
जिल्ह्य़ातील अहमदनगर, तसेच मुळा या दोन्ही पाटबंधारे विभागांचे १०० टक्के लाभक्षेत्र जिल्ह्य़ातच आहे. असे असताना हे दोन्ही विभाग मंडळ कार्यालयासाठी नाशिकला जोडण्यात आले आहेत. नगरला खात्याचे मंडळ कार्यालय कार्यरत असताना हे विभाग नाशिक मंडळाला जोडण्यात आले हे विशेष! अहमदनगर लघु पाटबंधारे विभागाचेही शंभर टक्के लाभक्षेत्र नगर जिल्ह्य़ातच आहे. हाही विभाग पुण्याला जोडण्यात आला आहे.
नगरला सक्षम मंडळ कार्यालय कार्यरत आहे. वरील सर्व विभाग त्यातून बाजूला काढून इतरत्र जोडण्यात आले, जे सर्वार्थाने सर्वाच्याच दृष्टीने अत्यंत गैरसोयीचे आहे. या मंडळ कार्यालयाकडे सध्या फक्त संगमनेरचे तीन व नाशिकचे तीन असे सहा विभाग कार्यरत आहेत. पाटबंधारे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निव्वळ व्यक्तिगत सोयीसाठी हा सर्व खेळ सुरू असल्याची शंका यावी, असाच प्रकार आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा शहरांमध्ये आपल्या वास्तव्याची सोय व्हावी हाच संबंधितांचा त्यामागचा हेतू असून, तीन मंत्र्यांसह जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधी केवळ पाण्याच्या वाटपातच नव्हे, तर पाटबंधारे कार्यालयांच्या अस्तिवाबाबतही पुण्याच्या ‘दादा’गिरीपुढे डोळे मिटून गप्प असल्याची भावना आता लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये जोर धरू लागली आहे.