Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

क्रीडा

राहुल द्रविड संघात परतण्याच्या मार्गावर; चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी आज संघनिवड
चेन्नई, १५ ऑगस्ट / पीटीआय

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड जवळपास दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंकेतील तिरंगी क्रिकेट मालिका व त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी उद्या भारताचे संघ निवडण्यात येणार आहेत. या दोन्ही स्पर्धासाठी द्रविड भारतीय संघात परतेल, अशी चिन्हे आहेत. भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली ही संघनिवड जाहीर करण्यात येईल.

सायकल मास्टर २००९ स्पर्धेत जांमडुलकर, बोर्डे, पंजवानी, चिंबुलकर विजेते
मुंबई, १५ ऑगस्ट / क्री. प्र.

स्वातंत्र्यदिनानिमित्त सायकल मास्टर २००९ च्या घेतलेल्या २.२ किलोमीटरच्या सायकल शर्यतीत खुल्या गटामध्ये अमित जांमडुलकर याने ३ मिनिटे १८ सेकंद या वेळेत स्पर्धा पूर्ण करून सायकल मास्टर २००९ हा किताब मिळविला. द्वितीय क्रमांक रमेश गौतम ३ मिनिटे २० सेकंद आणि तृतीय क्रमांक किरण पवार याने ३ मिनिटे २९ सेकंदांमध्ये स्पर्धा पूर्ण केली. १८ वर्षांखालील गटामध्ये प्रथम क्रमांक विकी बोर्डे ३ मिनिटे ११ सेकंद या वेळेत पूर्ण करून लिटिल सायकल मास्टर २००९ किताब मिळविला. द्वितीय क्रमांक महेश किर ३ मिनिटे १२ सेकंद, तृतीय क्रमांक भरत राजूला ३ मिनिटे १३ सेकंद या वेळेत स्पर्धा पूर्ण केली.

लक्ष्मण ठरला लँकेशायरसाठी लकी
लंडन, १५ ऑगस्ट / पीटीआय

ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या कौंटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेतील तीन दिवसांच्या सामन्यात भारताच्या व्हीव्हीएस लक्ष्मणने २३ धावांची छोटेखानी खेळी केली खरी पण त्यामुळे त्यांच्या लँकेशायर संघाला डरहॅमविरुद्धचा सामना अनिर्णीत राखता आला. पहिल्या डावात लक्ष्मणमने ८७ धावांची खेळी केली होती. त्यावेळी लँकेशायरचा संघ ३ बाद ४ अशा अतिशय बिकट स्थितीत सापडला होता.

विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेवर चीनचे वर्चस्व
हैदराबाद, १५ ऑगस्ट / पीटीआय

गतविजेत्या लिन डॅनच्या नेतृत्वाखाली चीनच्या खेळाडूंनी विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले. गच्चीबोली स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत डॅनने सहाव्या मानांकित इंडोनेशियाच्या सोनी ड्वि कुन्कोरोला २१-१४, १३-२१, २१-१५ असे पराभूत केले आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. पुरुषांच्या दुसऱ्या उपान्त्य फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेन जिनने चौथ्या क्रमांकावर असलेल्या तौफिक हिदायतला २१-१६, २१-१६ असे नमविले व अंतिम फेरीत धडक मारली.

मुंबई शहर कबड्डीची आज चुरशीची निवडणूक
मुंबई, १५ ऑगस्ट / क्री. प्र.

मुंबई शहर कबड्डी संघटनेची प्रतिष्ठेची पंचवार्षिक निवडणूक उद्या (रविवार) होत आहे. भारतीय क्रीडामंदिर, वडाळा येथे होणाऱ्या या निवडणुकीत राजाराम पवार आणि मारूती जाधव यांच्या दोन गटात ही निवडणूक रंगणार आहे. या दोन्ही गटांनी संघटनेचा कारभार आपण अधिक पारदर्शकपणे करू असा दावा करीत एकमेकांविरुद्ध दंड थोपटले आहेत. राष्ट्रीय खेळाडू असलेल्या राजाराम पवार यांच्या गटातून स्वत: पवार यांच्यासह श्रीधर जाधव, प्रदीप मयेकर, लक्ष्मीनारायण कामत, प्रदीप गवळी, भार्गव कदम, अमर पवार, अनिल घाटे, प्रमोद पेंडुरकर, मीनानाथ धानजी, जया शेट्टी,

मनपा शालेय कुस्ती स्पर्धेत शेख, पाटेकर, मस्तेकर, सहानी विजेते
मुंबई, १५ ऑगस्ट / क्री. प्र.

एफ/एस विभागातील मनपाच्या शाळांतील विभागीय अंतिम कुस्ती स्पर्धा रोजी साईबाबा पथ शाळेत मुंबई तालीम संघाच्या सहकार्याने पार पडला. स्पर्धेचे उद्घाटन प्रकाश चऱ्हाटेसाहेब, उपशिक्षणाधिकारी, परि. मं. १ यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेत १३ संकुलातील २३४ विद्यार्थी स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.

विश्वचषक स्पर्धेसंदर्भात बट्ट-मॉर्गन यांची भेट
कराची, १५ ऑगस्ट / पीटीआय

२०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील लढती पाकिस्तानकडून काढून घेण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या निर्णयासंदर्भात चर्चा करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एजाझ बट्ट व आयसीसीचे अध्यक्ष डेव्हिड मॉर्गन २७ ऑगस्ट रोजी दुबईत भेटणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, ही चर्चा फलद्रूप होईल, अशी आशा आहे आणि पाकिस्तानला त्यातून समाधानकारक असे काही हाती लागेल.

प्राथमिक फेरीत बोल्ट, गे यशस्वी
विश्व अॅथलेटिक्स
बर्लिन, १५ ऑगस्ट / एएफपी

विश्व अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या आज पहिल्या दिवशी विश्वविक्रमवीर युसेन बोल्ट आणि विश्वविजेता टायसन गे यांनी पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीची प्राथमिक फेरी यशस्वीपणे पार केली. बोल्टने १०.२० सेकंद अशी वेळ दिली आणि जमैकाच्या मायकेल फ्रॅटर व आसाफा पॉवेल यांना मागे टाकले. पॉवेलला या शर्यतीची सुरुवात निष्काळजीपणे करण्याचे फळ भोगावे लागले. त्याला १०.३८सेकंदांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या शर्यतीत धक्कादायक निकाल लागला तो बहामाचा डेरिक अॅटकिन्स ज्याने ओसाकात रौप्यपदक जिंकले होते, त्याला १०.४४ सेकंद अशी वेळ नोंदविता आली आणि तो पात्र ठरू शकला नाही. विश्वविजेत्या गे याने १०.१६ सेकंद वेळ देत प्राथमिक फेरीतील सर्वात कमी वेळ दिली.

भूपती-नोल्स उपान्त्य फेरीत
मॉन्ट्रियल, १५ ऑगस्ट / पीटीआय

भारताचा महेश भूपती व त्याचा दुहेरीतील सहकारी मार्क नोल्स यांनी एटीपी मॉन्ट्रियल मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत धडक मारली आहे. पोलंडच्या मॅरियुझ फ्राइस्टेनबर्ग व मार्सिन मॅटकोव्हस्की या जोडीला त्यांनी ६-३, ६-४ असे पराभूत केले. भूपती-नोल्स जोडीला हा विजय मिळविण्यासाठी केवळ तासाभराचा अवधी लागला. या दोघांनी उत्कृष्ट सव्र्हिसचा नमुना पेश करताना या सामन्यात प्रतिस्पर्धी जोडीला जे पाच ब्रेकपॉइंट मिळाले ते सर्व वाचविण्यात यश मिळविले.

मॉन्ट्रियल टेनिसमध्ये फेडरर, नदालला पराभवाचा धक्का
मॉन्ट्रियल, १५ ऑगस्ट / एएफपी

स्वीत्र्झलडचा रॉजर फेडरर व स्पेनचा राफेल नदाल याना मॉन्ट्रियल मास्टर्स टेनिस स्पर्धेत उपान्त्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्का सहन करावा लागला. जागतिक क्रमवारीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या फेडरर आणि नदाल यांना या स्पर्धेत आपल्या दर्जाला साजेसा खेळ करता आला नाही. फेडररला फ्रान्सच्या जो विल्फ्रेड त्सोंगाने ७-६ (७-५), १-६, ७-६ (७-३) असे नमविले तर गतविजेता नदाल अर्जेटिनाच्या जुआन डेल पोत्रोकडून ७-६ (७-५), ६-१ असा पराभूत झाला. गुडघेदुखीमुळे गेले दोन ते अडीच महिने टेनिसपासून दुरावलेल्या नदालची ही या स्पर्धेत कसोटी होती. पण त्याला अजूनही सूर गवसलेला नाही, हे स्पष्ट झाले. डेल पोत्रोची पुढील फेरीत अमेरिकेच्या अँडी रॉडिकशी गाठ पडेल. रॉडिकने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला ६-४, ७-६ (७-४) असे पराभूत केले.

फलंदाज जोनाथन ट्रॉट इंग्लंड संघातून पदार्पण करण्याची शक्यता
लंडन, १५ ऑगस्ट / एएफपी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात इंग्लंड लायन्स संघातून फलंदाज जोनाथन ट्रॉट याला वगळून इंग्लंडच्या निवड समितीने असा इशारा दिला आहे की अखेरच्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात इंग्लंड संघात ट्रॉट याला संधी देण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी इंग्लंडच्या दुसऱ्या फळीतील संघात ट्रॉटचे नाव होते, पण निवड समितीने त्याला या संघातून बाहेर काढल्यानंतर पुढील आठवडय़ात होणाऱ्या अखेरच्या अ‍ॅशेस कसोटीत तो इंग्लंड संघातून कसोटी पदार्पण करणार यात शंका नाही. या कसोटीसाठी इंग्लंडची निवड समिती उद्या संघ जाहीर करणार आहे. गुरुवारी ही कसोटी सुरू होईल. चौथ्या कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजीतील निराशाजनक कामगिरीमुळे निवड समिती फलंदाजीत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा विचार करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून ट्रॉटला संधी मिळण्याची शक्यता आहे.

हॉकी : नेदरलॅण्ड्सकडून भारताची हार
अ‍ॅमस्टलविन, १५ ऑगस्ट / पीटीआय

युरोपियन दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात भारतीय हॉकी संघाला निराशाजनक सुरुवातीला सामोरे जावे लागले. नेदरलॅण्ड्सविरुद्धच्या सामन्यात त्यांना ३-५ असा पराभव सहन करावा लागला. ही मालिका दोन सामन्यांची आहे. नेदरलॅण्ड्सच्या संघाने या सामन्यात भारतावर सुरुवातीपासूनच वर्चस्व स्थापन केले. पहिल्याच सत्रात नेदरलॅण्ड्सने पाच गोल करून भारताच्या आत्मविश्वासालाच धक्का दिला. मात्र दुसऱ्या सत्रात भारताने तीन गोल केले, पण ते पराभव टाळण्यास पुरेसे नव्हते. हे गोल सरदारसिंग (४०), प्रभज्योतसिंग (६० व ६९ मिनिट) यांनी केले.

चीन ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात
नवी दिल्ली, १५ ऑगस्ट / पीटीआय

चीनमधील टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. नेहा अगरवाल, सौम्यजीत घोष व सनील शेट्टी यांना तिआनजीन येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत हार पत्करावी लागली. २१ वर्षांखालील मुलांच्या या स्पर्धेत मुलींमध्ये नेहा अगरवालला सिंगापूरच्या यु मेंग यु हिने ०-४ असे नमविले तर घोषला कोरियाच्या ले सांग सु कडून हार सहन करावी लागली.
शेट्टीला कोरियाच्या हान जि मिनकडून पराभव सहन करावा लागला पण त्याने २-४ असा पराभव स्वीकारण्यापूर्वी कडवा प्रतिकार केला.