Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

भारतीय स्वातंत्र्याचा हा लढा केवळ आपल्या देशातूनच नव्हे तर जे आपल्यावर राज्य करीत होते त्या ब्रिटनमधूनही चालवला गेला हे अनेकांना माहीत नसेल. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्याच्या लढय़ाची ही पताका अशीच फडकत ठेवली. त्यांच्यापैकीच एक होते मदनलाल धिंग्रा. अतिशय निश्चयी व अत्युच्च त्यागाची मूर्ती. जाज्ज्वल्य देशभक्ती त्यांच्या नसानसात भिनलेली होती. दुर्दैवाने त्यांच्या क्रांतिकार्याचा फारसा परिचय सामान्य लोकांना झालेला नाही त्यामुळे ते काहीसे उपेक्षित राहिले असे म्हणावे लागते. मदनलाल धिंग्रा १७ ऑगस्ट १९०९ मध्ये हसत हसत फासावर चढले. त्यांच्या या हौतात्म्याची शताब्दी या वर्षी पाळली जात आहे. त्यांच्या अतुलनीय त्यागाची ही कहाणी संस्मरणीय ठरावी अशीच आहे.
भाखथथथरताला स्वातंत्र्य मिळाले पण त्यासाठी अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, हसत हसत ते फासावर चढले, देशाला ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेतून त्यांनी मुक्त केले. अर्ज-विनंत्या, प्रार्थना करून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले नाही. क्रांतिकारकांनी जो सशस्त्र लढा आपल्या मायभूमीसाठी दिला त्यातूनच स्वातंत्र्याची नवी पहाट उगवली आहे, त्यासाठी अनेकांनी रक्त सांडले आहे. १९४६ मधले नाविकांचे बंड ही या क्रांतिकारी लढय़ाची परमावधी होती. भारतीय स्वातंत्र्याचा हा लढा केवळ आपल्या देशातूनच नव्हे तर जे आपल्यावर राज्य करीत होते त्या ब्रिटनमधूनही चालवला गेला हे अनेकांना माहीत नसेल. त्याकाळात श्यामजी कृष्णवर्मा, स्वातंत्र्यवीर सावरकर, मॅडम भिकाजी कामा, बॅरिस्टर सरदार सिंग राणा, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, सरदार अजित सिंग, लाला हरदयाळ, रासबिहारी बोस, राजा महेंद्र प्रताप, चंपक्रमण पिल्ले अशा अनेकांनी तेथे राहून स्वातंत्र्याच्या लढय़ाची ही पताका अशीच फडकत ठेवली. त्यांच्यापैकीच एक होते मदनलाल धिंग्रा. अतिशय निश्चयी व अत्युच्च त्यागाची मूर्ती. जाज्ज्वल्य देशभक्ती त्यांच्या नसानसात भिनलेली होती. दुर्दैवाने त्यांच्या क्रांतिकार्याचा फारसा परिचय सामान्य लोकांना झालेला नाही त्यामुळे ते काहीसे उपेक्षित राहिले असे म्हणावे लागते. मदनलाल धिंग्रा १७ ऑगस्ट १९०९ मध्ये हसत हसत फासावर चढले. त्यांच्या या हौतात्म्याची शताब्दी या वर्षी पाळली जात आहे. त्यांच्या अतुलनीय त्यागाची ही कहाणी संस्मरणीय ठरावी अशीच आहे.
मदनलाल धिंग्रा यांचा जन्म १८ सप्टेंबर १८८३ मध्ये अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील डोळ्यांचे निष्णात डॉक्टर होते, अमृतसरमध्ये ते सिव्हील सर्जन होते. ते पहिले भारतीय सिव्हील सर्जन होते असेही म्हटले जाते. त्यांच्या वडिलांना सात मुलगे होते. त्यातील मदनलाल हे सहावे. त्यांचे दोन बंधू हे डॉक्टर होते तर एक भाऊ एमआरसीपी होते. दोन भाऊ बॅरिस्टर होते. मदनलाल हे विवाहित होते व त्यांना एक मुलगा होता. ठरवले असते तर ते ऐषाआरामात जीवन जगू शकत होते पण त्यांनी वेगळा मार्ग निवडला व मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या लढय़ाच्या धगधगत्या अग्निकुंडात आहुती देण्यासाठी ते सिद्ध झाले. मदनलाल हे उच्चशिक्षित होते त्यांनी १९०६-०९ या काळात लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून सिव्हील इंजिनियिरगचा डिप्लोमा केला होता. ते शिकत होते त्या कॉलेजात दादाभाई नवरोजी हे गुजरातीचे प्राध्यापक होते. रवींद्रनाथ टागोर यांचे इंग्रजीचे शिक्षण याच कॉलेजमध्ये झाले होते.
तो काळ होता १९०५ चा. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये ६५, कॉर्नवेल अ‍ॅव्हेन्यू येथे एक घर खरेदी केले होते. पुढे त्याचेच रूपांतर इंडिया हाऊसमध्ये झाले. (सध्या भारतीय दूतावास ज्या ‘इंडिया हाऊस’ मध्ये आहे, ते हे नव्हे.) लोकमान्य टिळकांनी त्यांच्या केसरी या वृत्तपत्रातून श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या लंडनमधील कार्याची दखल घेतली होती. ती वाचून स्वातंत्र्यवीर सावरकरांना प्रेरणा मिळाली. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू केली होती, सावरकरांनी लगेच शिवाजी स्कॉलरशिपसाठी अर्ज केला व १५ जून १९०६ मध्ये ते लंडनला आले. कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या सावरकरांच्या मनात वेगळेच काही चाललेले होते. ब्रिटिशांची बलस्थाने व कमजोरी काय आहे याचा अभ्यास ते करीत होते. सावरकरांनी तेथे गेल्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. भारतात ज्या बैठका घ्यायला बराच आटापिटा करावा लागायचा तशा बैठका लंडनमध्ये राजरोसपणे घेता येणे शक्य होते. १९०७ मध्ये ग्रेट ब्रिटनमध्ये ७०० भारतीय विद्यार्थी होते त्यातील ३८० लंडनमध्ये होते. सावरकरांनी तेथे गेल्यावर रशिया, चीन, आर्यलड, तुर्कस्थान इजिप्त व इराण या देशांच्या क्रांतिकारकांशी संपर्क साधायला सुरूवात केली. त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्र शिकण्याची त्यांची इच्छा होती. पिस्तुले व दारूगोळा मिळवण्यातही या क्रांतिकारकांची मदत होईल असे त्यांना वाटत होते. सावरकर लंडनमध्ये आले व तेथे अतिशय झपाटय़ाने त्यांनी काम सुरू केले. ते दर रविवारी लंडनमध्ये बैठका घेत असत व त्यात भारताच्या भवितव्यासह वेगळ्यावेगळ्या विषयांवर चर्चा होत असत, त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनाही या बैठकांची गोडी लागली. इंडिया हाऊसमध्ये या बैठकांना उपस्थित राहणाऱ्यांमध्ये लाला हरदयाळ, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय (सरोजिनी नायडू यांचे बंधू व क्रांतिकारक), सेनापती बापट, दादाभाई नवरोजी, लाला लजपत राय, बिपीनचंद्र पाल, मॅडम कामा, दादासाहेब करंदीकर, खापर्डे यांच्यासारखे दिग्गज होते. तरूणपणी बॅरिस्टर होणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांची याच इंडिया हाऊसमध्ये सावरकरांशी भेट झाली होती. अनेक देशांचे क्रांतिकारक त्यावेळी या बैठकांना येत असत त्यात रशियाचा लेनिनही होता.
मदनलाल धिंग्रा अभ्यासाच्या निमित्ताने लंडनला आले. उंचापुरा, धिप्पाड व मजबूत अंगयष्टी असलेल्या मदनलाल यांना सुरूवातीला गमती जमती करण्यात रस होता त्यामुळे तेथील तरूण मंडळी त्यांच्याकडे आकर्षित झाली नसती तरच नवल! मदनलाल व त्यांचे मित्र असेच स्वप्नवत जगात होते, रोमँटिक गाणी, गप्पागोष्टी असा त्यांचा दिनक्रम होता. स्वातंत्र्याच्या कल्पनेचे वारे त्यांच्या मनालाही शिवलेले नव्हते. एकदा अशीच रविवारी इंडिया हाऊसमध्ये बैठक चालू होती, तेव्हा शेजारच्या खोलीतून धांगडधिंग्याचा आवाज यायला लागला, सावरकरांचे भाषण सुरू होते. नंतर या गोंधळाचा आवाज असह्य़ होऊन सावरकर शेजारच्या खोलीत एवढा कसला गोंधळ चालला आहे हे बघायला गेले. तेथे मदनलाल व त्यांचे मित्रमंडळी त्यांच्याच मस्तीत दंग होते. सावरकर म्हणाले की, मदन काय चाललंय. तू शौर्याच्या बाता मारतोस आणि साप्ताहिक बैठकीला येतही नाहीस. तुझे जे काय चालले आहे त्यात कुठले शौर्य आहे. सावरकरांच्या या बोलण्याचा मदनलालवर व्हायचा तो परिणाम झाला. तो एकदम गप्प झाला , त्याने इंडिया हाऊस सोडले व नंतर अनेक दिवस सावरकरांना तोंडही दाखवले नाही. त्यानंतर अनेक दिवसांनी सगळे धैर्य एकवटून तो इंडिया हाऊसमध्ये आला व त्याने सावरकर अजूनही आपल्यावर रागावलेले आहेत काय याचा अंदाज घेतला. दोघांची भेट झाली. सावरकर मागचे सगळे विसरले होते, त्यांनी प्रेमाने त्याची चौकशी केली. मदनलालनी सावरकरांना विचारले, हौतात्म्यासाठी वेळ आली आहे काय? त्यावर सावरकर म्हणाले की, जर हुतात्मा मनाने तयार असेल तर तशी वेळ आली आहे असे समजायला हरकत नाही.
जुलै १९०८ मध्ये मदनलाल यांनी जाणीवपूर्वक नॅशनल इंडियन असोसिएशन या संघटनेत प्रवेश केला, भारतीय विद्यार्थ्यांना बंडखोरीच्या मार्गापासून रोखण्यासाठीच ही संघटना होती. अनेक बडे इंग्रज अधिकारी या संघटनेच्या बैठकांना यायचे. त्यावेळी मदनलाल धिंग्रा यांनी सावरकर व त्यांच्या सहकारी क्रांतिकारकांचा निषेध करून मिस एम्मा जोसेफाईन बेक यांचा विश्वास संपादन केला. त्या या संघटनेच्या सचिव होत्या. नंतर संधीचा फायदा घेऊन धिंग्रा यांनी इंडिया हाऊस सोडले, सावरकरांशी मतभेद झाल्याचे नाटक त्यांनी केले. नंतर ते १०८, लॅडबरी रोड, लंडन येथे राहू लागले. सर कर्झन वायली याचा खून करण्यापूर्वी मदनलाल धिंग्रा यांनी लॉर्ड कर्झन याचाही खून करण्याचा प्रयत्न केला होता. कर्झन हा अतिशय उर्मट व्हॉईसराय होता. तो दोनदा मदनलाल यांच्या हल्ल्यातून वाचला. मदनलाल यांनी बंगालचा माजी गव्हर्नर ब्रॅमफील्ड फुल्लर याचाही काटा काढण्याचा प्रयत्न केला होता, पण तो उपस्थित असलेल्या बैठकीला मदनलाल उशिरा पोहोचले व सगळा डावच फसला. त्यानंतर मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायली याला ठार मारण्याचे ठरविले. केवळ कर्झन या नामसाधम्र्याच्या दुसऱ्या इंग्रज अधिकाऱ्याला ठार करायचे असा काही प्रकार नव्हता तर कर्झन वायली हा सुद्धा एक बडा इंग्रज अधिकारी होता. १८६६ मध्ये तो ब्रिटिश लष्करात आला होता व नंतर अनेक महत्त्वाची पदे त्याने सांभाळली होती. तो गुप्तचर पोलिसांचा प्रमुखही होता. त्याने इंडिया हाऊसमध्ये एक खबऱ्या पाठवला होता. त्याचे नाव कीर्तीकर. कीर्तीकरने त्यावेळी दंतवैद्यकाचा विद्यार्थी असल्याचे ढोंग करीत सावरकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कारवाया इंग्रजांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केले होते पण सावरकरांनी कीर्तीकरला पकडले व धमकावले तेव्हा तो सुतासारखा सरळ आला व त्याने पोलीस कुठल्या योजना आखत आहेत याची माहिती सावरकरांना दिली.
मदनलाल धिंग्रा हे कर्झन वायली याला चांगले ओळखत होते. मदनलालचे बंधू कुंदनलाल धिंग्रा यांनी वायलीला एक पत्र पाठवले होते. त्यानंतर त्यांनीच मदनलाल यांना वायलीला भेटण्यास सांगितले होते. धिंग्रा नंतर भावाच्या पत्रातील तपशिलावर चर्चा करण्याच्या बहाण्याने त्यांनी वायलीची भेट घेतली. नॅशनल इंडियन असोसिएशनचा सदस्य म्हणून धिंग्रा वायलीच्या जवळ पोहोचले होते. २९ जुलै १९०९ रोजी त्यांनी कर्झन वायलीच्या खुनाचा कट आखला. सावरकरांची भेट घेतली त्यावेळी बिपीनचंद्र पाल उपस्थित होते. वायलीच्या खुनानंतर काय सांगायचे हे सावरकरांनी मदनलाल यांना सांगितले होते. निरंजन पाल यांनी मदनलाल यांना सावरकरांनी वायलीच्या खुनानंतर करायच्या निवेदनाची एक प्रत दिली. सावरकरांनी त्याचवेळी मदनलाल यांच्या हाती बेल्जियन बनावटीचे ब्राऊनिंग पिस्तूल ठेवले व नंतर मदनलाल यांनी प्रेमाने त्यांचा निरोप घेतला. पण निघताना ते भावविवश झाले. सावरकर मात्र कणखरपणे म्हणाले, जर तू या मोहिमेत अपयशी ठरलास तर मला परत तोंड दाखवायला येऊ नकोस. मदनलाल यांनी तसे घडणार नाही असा शब्द सावरकरांना दिला. ३० जूनला मदनलाल परत सावरकरांना भेटायला गेले होते पण त्यावेळी त्यांची भेट होऊ शकली नाही. कर्झन वायलीच्या खुनाच्या मोहिमेवर जाण्यापूर्वी मदनलाल अगदी शांत होते. कोरेगावकर नावाचे सहकारी त्यांच्याबरोबर इंपिरियल इन्स्टिटय़ूटमधील त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार होते. मदनलाल यांनी निघण्यापूर्वी दुपारचे भोजन केले व चहा घेतला. दुपारी दोन वाजता ते घरातून निघाले, त्यांनी कातडी मूठ असलेले नवे कोरे खंजीर खिशात ठेवले होते, नंतर ते फनलँडला गेले व तेथे अठरा फुटांवरून गोळ्या मारून सराव केला. त्यातील अकरा गोळ्यांनी लक्ष्यभेद केला. नंतर रिव्हॉल्वर स्वच्छ करून घेतली. सायंकाळी सात वाजता त्यांनी लाऊंज सूट परिधान केला व निळ्या रंगाची पंजाबी तुर्बान घातली. जवळचे कोल्ट रिव्हॉल्वर गोळ्या भरून सज्ज केले व उजव्या खिशात ठेवले. दुसरे एक रिव्हॉल्वर वेगळ्या खिशात ठेवले. सावरकरांनी जे काय सांगितले होते ते लक्षात राहिना म्हणून त्यांनी ते एका कागदावर लिहून घेतले व तो कागद कोटाच्या आतल्या खिशात ठेवला. काही वृत्तपत्रांची कात्रणेही त्यांच्या खिशात होती. त्यावेळी त्यांनी १०-१२ शिलिंग इतकी रक्कमही बरोबर घेतली होती. त्यांनी नंतर लगेचच पहिली कॅब पकडली व समारंभाच्या ठिकाणाकडे रवाना झाले. तो दिवस होता १ जुलै १९०९ पण त्यांचे दुर्दैव म्हणजे समारंभासाठी आवश्यक असलेला पास आणायला ते विसरले. त्या संस्थेचा सदस्य असल्याने त्यांना व्हिजिटर्स बुकमध्ये सही करून आत जाऊ देण्यात आले. कोरेगावकरही पिस्तूल घेऊन आले होते. ती सभा संपली व कर्झन वायली निघण्याच्या तयारीत होता. कोरेगावकर धिंग्रांना म्हणाले, अरे जावो ना. क्या करते हो. मग लगेच मदनलाल धिंग्रा वायलीच्या दिशेने गेले. त्याच्याशी बोलण्याचे सोंग केले. वायली व धिंग्रा काचेचे प्रवेशद्वार लोटून बाहेर निघाले. नंतर मदनलाल यांनी आवाज काहीसा बारीक करून गोपनीय बोलण्याचे नाटक केले. वायलीने कान मदनलाल यांच्या जवळ आणला तेवढय़ात मदनलालनी डाव साधला व उजव्या खिशातून कोल्ट पिस्तूल काढून अगदी जवळून दोन गोळ्या वायलीला मारल्या. तेव्हा रात्रीचे ११ वाजून २० मिनिटे झालेली होती. कर्झन वायली कोसळल्यानंतर मदनलाल यांनी आणखी दोन गोळ्या त्याच्यावर झाडल्या. त्यावेळी कावस लालकाका नावाचा एक पारशी डॉक्टर दोघांच्या मधे आला होता, मदनलालने त्याच्यावरही गोळ्या झाडल्या. नंतर ते स्वत:वर गोळी झाडून घेणार होते पण ते जमले नाही. काहींनी मदनलालना पकडले. त्या झटापटीतही त्यांनी एकाच्या बरगडय़ा मोडल्या, त्यांचा चष्मा फेकून देण्यात आला. डॉक्टरांनी लगेच मदनलाल यांची नाडी तपासली ती व्यवस्थित होती, ते घाबरलेले नव्हते. तुमच्या अटकेची माहिती तुमच्या मित्रांना द्यायची आहे काय, असे विचारले असता त्याची काही गरज नाही. वृत्तपत्रातून त्यांना उद्या काय ते समजेलच असे उत्तर त्यांनी दिले. नंतर त्यांना वॉल्टन स्ट्रीट पोलीस स्टेशनला नेण्यात आले. कालांतराने त्यांना वेस्टमिनस्टर पोलीस कोर्टात मॅजिस्ट्रेट होअर्स स्मिथ यांच्यापुढे हजर करण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, दयेची भीक मी मागणार नाही. तुमचा अधिकार मी मान्य करीत नाही. जर जर्मन लोकांना इंग्लंडवर राज्य करण्याचा अधिकार नाही तर मग इंग्रजांना भारतावर राज्य करण्याचा अधिकार कसा काय असू शकतो.
धिंग्रा यांच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी ५ जुलै १९०९ रोजी कॅक्सटन हॉल येथे सभा झाली. आगाखान अध्यक्षस्थानी होते. निषेधाचा ठराव मांडण्यात आला. अनेक हात उंचावले गेले तेव्हा आगाखान म्हणाले, ठराव संमत झाला. त्यावर सावरकरांनी निषेध नोंदवला. ते म्हणाले, ठराव एकमताने मंजूर झालेला नाही. मला हा निषेध मान्य नाही, मग तेथे बराच गोंधळ झाला. पामेर नावाच्या युरेशियन माणसाने सावरकरांना ठोसा लगावला, त्यांच्या डोळ्याजवळ लागले. रक्त आले. सावरकर तरीही म्हणाले, माझा विरोधच आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी नंतर उठले व म्हणाले की, सावरकरांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे, त्यांच्यावर हल्ला करणे योग्य नाही.
मदनलाल धिंग्रा यांची निर्भय देशभक्ती पाहून काही इंग्रजांनाही त्यांना दया दाखवावी असे वाटले होते. रिव्ह्य़ू ऑफ रिव्ह्य़ूजचे संपादक डब्ल्यू.टी. स्टेड हे तशांपैकी एक होते. सावरकर व त्यांच्या स्वातंत्र्यलढय़ाचे ते समर्थक होते, त्यांच्या या मतांमुळे स्टेड यांना तुरूंगातही टाकण्यात आले होते. लंडनच्या ईव्हिनिंग पोस्टनेही असेच मत व्यक्त केले होते. त्यावेळी ब्रिटनच्या मंत्रिमंडळातील काही सदस्यांनीही मदनलालना फाशी दिल्यास त्यामुळे बंडाळीची कृत्ये आणखी वाढतील अशी भीती व्यक्त केली होती.
अखेर तो दुर्दैवी दिवस उजाडला. १७ ऑगस्ट १९०९, याच दिवशी मदनलाल धिंग्रा यांना पेंटोव्हिले तुरूंगात फासावर चढवण्यात आले. धिंग्रा यांच्या मित्रांनी त्यांची अखेरची भेट घेण्यासाठी प्रयत्न केले. सावरकरांच्या सूचनेवरून जेएस मास्टर यांनी त्यासाठी अर्जही केला होता पण तो फेटाळण्यात आला. शेवटी मित्रांची भेट झाली नाही तरी मदनलाल शांत होते. रात्री त्यांना शांत झोप लागली होती. फाशीच्या दिवशी ते सकाळीच उठले. न्याहारी केली. अनेक शोकाकुल भारतीय तुरूंगाबाहेर जमले होते. त्यांना आत प्रवेश नव्हता. पत्रकारांनाही बाहेरच ठेवले होते. सकाळी नऊच्या ठोक्याला मदनलाल यांचा अखेरचा प्रवास सुरू झाला. एका ख्रिश्चन धर्मगुरूने त्यांना ख्रिश्चन प्रार्थना म्हणण्यास सांगितले. पण मी हिंदू आहे, असे सांगून त्यांनी नकार दिला. पायरपॉईंट नावाचा अधिकारी फाशीच्या तख्ताशी सज्ज होता पण धिंग्रा हसले व जिना चढून आले, त्यांनी स्वत:च फाशीचा दोर गळ्यात अडकवून घेतला. लगेचच त्यांच्या पायाखालची फळी काढण्यात आली. फास आवळला गेला. त्यांचे पार्थिव आठ फुटांवर लटकत राहिले. नंतर ते उतरवण्यात आले. त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी ताब्यात देण्याची जेएस मास्टर यांची विनंती फेटाळण्यात आली. याच तुरूंगात ३१ जुलै १९४० रोजी उधमसिंग यांना फासावर लटकवण्यात आले होते. धिंग्रा यांचे पार्थिव पेटीत घालून त्याच तुरूंगात पुरण्यात आले. कुणाचा विश्वास बसणार नाही पण मदनलाल धिंग्रा यांचे हौतात्म्य हा ब्रिटनच्या मंत्रिमंडळात नंतरही चर्चेचा विषय ठरला. त्यावेळी लॉईड जॉर्ज असे म्हणाले होते की, आपल्याकडे (ब्रिटनमध्ये) रेग्युलस व कॅरॅक्टस व प्लुटार्क जसे सदैव स्मरणात राहिले तोच मान धिंग्रा यांना भारतात राहील. विन्स्टन चर्चिल यांनी त्या मंत्रिमंडळ बैठकीत धिंग्रा यांच्या देशभक्तीचे कसे कौतुक झाले हे ब्लन्ट यांना सांगितले होते व त्याची नोंद ब्लन्ट यांनी त्यांच्या ‘माय डायरीज’ मध्ये केली आहे. चर्चिल यांनीही धिंग्रा यांनी जे अखेरचे निवेदन केले होते त्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. त्यानंतर काही काळ गांधीजी लंडनमध्ये काहीकाळ वास्तव्यास होते. त्यांनी मदनलाल यांच्या कृत्याचा त्यांच्या अहिंसा तत्त्वज्ञानाला अनुसरून निषेध केला. हे सगळे क्रांतिकारक अराजकतावादी आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले. धिंग्रा यांच्या या हौतात्म्याचा आर्यलडमध्ये सन्मान झाला. ‘आर्यलड ऑनर्स धिंग्रा’ अशी पोस्टर्स सगळीकडे लागली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे हंगामी उच्चायुक्त असलेले नटवर सिंग ब्रिटनला गेले होते. त्यांनी ज्या तुरूंगात मदनलाल यांना फाशी देण्यात आले तिथे भेट दिली. १२ डिसेंबर १९७६ रोजी मदनलाल यांची शवपेटी बाहेर काढण्यात आली. ती नंतर भारतात आणण्यात आली. भारतमातेच्या या थोर सुपुत्राच्या आठवणीच प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या आहेत. त्यांना कोटी कोटी प्रणाम.
डॉ.श्रीरंग गोडबोले
अनुवाद - राजेंद्र येवलेकर