Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

सरहद्दीपलीकडील राजदूत
इइस्लामाबादेत नियाझ नाईक यांचा काही दिवसांपूर्वी झालेला खून त्यांच्या असंख्य मित्रांना आणि परिचितांना धक्का देऊन गेला. पाकिस्तानचे ते ख्यातनाम राजनैतिक प्रतिनिधी होते आणि आपल्या परराष्ट्र सचिवपदावरल्या निवृत्तीनंतर त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध सुरळीत व्हावेत यासाठी पडद्यामागून मुत्सद्देगिरीचे निकराचे प्रयत्न केले. नियाझ नाईक यांचे विशेष हे की, त्यांच्यासारखेच अनेक मित्र आणि हितचिंतक त्यांना नवी दिल्लीत लाभले. कारगिलच्या युद्धानंतर परस्परांचे संबंध मूळ पदावर यावेत, यासाठी त्यांनी भारतीयांसमवेत काम केले. त्यांचा खून हा अमानुष होता आणि ज्यांना भारताबरोबरचे संबंध शांततेचे होऊ नयेत, असे वाटते, अशा पाकिस्तानी शक्तींनीच तो केला, असा संशय आहे. हालहाल करून त्यांना ठार करण्यात आले.
नियाझ हे राजनीतिज्ञांचे राजनीतिज्ञ होते. खरेतर अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत. सभ्य शिष्टाचारी आणि अतिशय लाघवी, असे हे व्यक्तिमत्त्व! त्यांना मी ऑगस्ट १९६५ मध्ये सर्वप्रथम जीनिव्हात भेटलो. त्यावेळी ‘युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’च्या बैठकीस वाणिज्य मंत्रालयाचा प्रतिनिधी म्हणून मी तिथे उपस्थित होतो. विकसनशील देशांमध्ये व्यापारविषयक चर्चा आणि विचारविनिमय होण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने या बैठकीचे आयोजन केले होते. आशियामध्ये असणारे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश या चर्चेत समरसून सहभागी झाले होते. ब्रुसेल्समध्ये असणारे दोन्ही देशांचे राजदूत या चर्चेत सहभागी झालेल्या उभय प्रतिनिधींचे नेते होते. भारताच्या वतीने ‘आयसीएस’ असलेले के. बी. लाल यांनी नेतृत्व केले, तर पाकिस्तानच्या बाजूने महमद आयुब हे होते. तेही फाळणीपूर्वीचे ‘आयसीएस’ होते. दोघेही अगदी मुरलेले मुत्सद्दी होते. नियाझ नाईक हे तेव्हा ब्रुसेल्समध्ये पाकिस्तानचे व्यापारी प्रतिनिधी होते आणि मी आंतरराष्ट्रीय राजकारणातला एक नवखा! त्याआधी केवळ सहाच महिने मी संरक्षण मंत्रालयाकडून वाणिज्य मंत्रालयाकडे बदलून गेलो होतो. १९४७ नंतरच्या पहिल्या पिढीच्या प्रशासकीय सेवेचे नियाझ आणि मी दोघेही प्रतिनिधी होतो. आम्हा दोघांचा परिचय हा अगदी योगायोगाने झाला होता.
मी जेव्हा जीनिव्हाकडे प्रयाण केले, तेव्हा जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर मोठय़ा प्रमाणावर पाकिस्तानकडून घुसखोरी चालू झाली होती. १ सप्टेंबरच्या भल्या सकाळी बातमी आली की, पाकिस्तानी लष्कराने चिनाबचा पूल ताब्यात घेऊन भारताचे काश्मीरच्या खोऱ्याशी असणारा संपर्क तोडण्यासाठी अखनूर भागात जोरदार आक्रमण केले आहे. त्या बैठकीला हजर असणाऱ्या अनेक प्रतिनिधींना आशियाई गटाचे महत्त्वाचे प्रतिनिधी आता परस्परांवर तुटून पडणार आणि मग परिषदेची ती बैठकच कोलमडून पडेल, असे वाटले. तथापि दोन्ही बाजूंच्या राजदूतांना मात्र तसे वाटले नाही. दोन्ही बाजूंचे शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रासादातल्या ‘कॉफी लाऊंज’मध्ये भेटले. उपखंडात सरहद्दीवर चाललेल्या युद्धाने जीनिव्हातले काम बिघडता कामा नये. युद्धाच्या बातम्यांमुळे उभय देशांनी व्यापारविषयक प्रश्नांना ज्या संघटितपणे तोंड दिले त्यात विघ्न येऊ नये, हे त्या उभय शिष्टमंडळांनी निश्चित केले. उभयतांची संस्कृती आणि भाषा समान असल्याने दोन्ही बाजूंनी अगदी मित्रत्वाचे नसले तरी आपल्या सभ्यतेच्या, तसेच औचित्याच्या मर्यादा ओलांडू नयेत, असेही ठरले. दोन्ही बाजू एकमेकांचे अभिनंदन करतील, पण हस्तांदोलन करणार नाहीत. नियाझ आणि मी दोघेही सौहार्दपूर्ण पद्धतीने एकत्रित भूमिका बजावतो आहोत, हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. नियाझ हे आदर्श राजनीतिज्ञ आहेत आणि त्यांच्याकडून रचनात्मक मुत्सद्देगिरीचे पाठ घ्यायची गरज आहे, हे माझ्या लक्षात आले.
त्यानंतर मी जीनिव्हात भारताचा निवासी प्रतिनिधी म्हणून काम पाहू लागलो आणि नियाझ हे पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रसंघातले कायमचे प्रतिनिधी म्हणून काम पाहायला न्यूयॉर्कला रवाना झाले. मी क्वचितप्रसंगी त्यांना तिथे भेटत असे. आमची सर्वात संस्मरणीय भेट मुंबईत मी मुख्य सचिव असताना घडली. १९८३ मध्ये पाकिस्तानच्या उपदूतावासासाठी -व्यापारी कचेरीसाठी- कायमची जागा पाहण्याच्या उद्देशाने ते मुंबईत आले होते. आपल्या परराष्ट्र सचिवांनी मला कळविले की, पाकिस्तानला मलबार हिलवर असणाऱ्या ‘जीना हाऊस’मध्येच जास्त रस आहे. मात्र राज्य सरकारने त्यासंदर्भात त्यांना कोणताही शब्द देऊ नये. मी जीना हाऊसच्या भेटीची सर्व व्यवस्था केली. तिथून ते मला आणि माझ्या पत्नीला भेटायला थेट घरी आले. विशेष म्हणजे जीना हाऊसच्या जागेविषयी त्यांनी माझ्याशी बोलताना तोंडातून ब्रसुद्धा काढला नाही. त्यांनी त्यावेळी महालक्ष्मीवर रेस पाहायची इच्छा व्यक्त केली. पाकिस्तानात घोडय़ांच्या शर्यतींवर बंदी आहे. दुसरा दिवस रविवारचा होता. मी त्यांना महालक्ष्मी रेसकोर्सवर घेऊन गेलो. तिथे आम्ही ‘गव्हर्नर्स बॉक्स’मध्ये बसलो. त्यांनी मला एक विनंती केली की, त्यांचे तिथे फोटो निघता कामा नयेत. जर असे एखादे छायाचित्र वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले, तर आपली नोकरीच जाईल, ही त्यांना वाटणारी भीती त्यामागे होती. अर्थातच मी त्याबाबत योग्य ती काळजी घेतली.
तिथून उठताना ते म्हणाले की, ‘प्रधान, आता जीना हाऊसबद्दल थोडेसे. मला माहिती आहे की, तुमचे सरकार जीना हाऊस आमच्या स्वाधीन करणार नाही. तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बरोबर समोरच्या बाजूस पाकिस्तानचा उपदूतावास उभा राहू देणे अवघड आहे, याची मला कल्पना आहे.’
त्यांची ही मागणी मान्य न करण्यामागे इतरही अनेक कारणे आहेत. त्यामुळे मी आपल्या परराष्ट्र मंत्रालयास त्यांच्या भेटीचा इतिवृत्तान्त कळवला. नियाझ नाईक हे एकाच वेळी नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घेणारे राजनीतिज्ञ होते आणि तेच पडद्यामागून केल्या जाणाऱ्या त्यांच्या मुत्सद्देगिरीचे गमक आहे. त्यांच्या देशातल्या दुष्ट शक्तींनी आपल्या मार्गातल्या एका अडथळय़ाचा असा काटा काढला, हे दुर्दैव आहे.
राम प्रधान