Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना फाशी द्या हीच जनतेची भावना!’
मुख्यमंत्रीपदाच्या आपल्या अल्पकालीन कारकीर्दीची तुलना मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे २०-२० मॅचशी करतात. इंडियन एक्स्प्रेसचे एडिटर इन चीफ शेखर गुप्ता यांनी एनडीटीव्हीच्या ‘वॉक द टॉक’ या कार्यक्रमात अशोक चव्हाण यांची विशेष मुलाखत घेतली. मुंबईमध्ये २६/११ ला झालेल्या हल्ल्यानंतर उभी ठाकलेली आव्हाने, पोलीस दलाचे आधुनिकीकरण तसेच ते अधिक सामथ्र्यशाली करणे, सी लिंक, आगामी विधानसभा निवडणुका अशा अनेक विषयांबाबत या मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मनमोकळी उत्तरे दिली.
नव्यानेच बांधलेल्या वांद्रे-वरळी सागरी सेतूस्थानी रिमझिम पावसाच्या सोबतीने एका प्रसन्न सकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या या मुलाखतीस प्रारंभ झाला.
काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान तुम्हाला मिळाला आहे.
मी किती तरुण आहे मला माहीत नाही, मात्र मनाने मी कायमच तरुण आहे.
तुम्ही मनाने तरुण आहात अशी प्रशंसा मी ८० वर्षे वयाच्या एका गृहस्थांकडून ऐकली आहे. ही भावनाच खूप सुंदर आहे.
हा देखणा वांद्रे-वरळी सागरी सेतू बघताय. मुंबईचे एक आगळे वैशिष्टय़ ठरलेला हा सागरी सेतू नितांत सुंदर आहे. या सेतूमुळे प्रवासाचा वेळ अध्र्या तासाने कमी करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. मुंबईच्या वैशिष्टय़ांमध्ये गेट वे ऑफ इंडियानंतर आता वांद्रे-वरळी सागरी सेतूचाच क्रमांक लागेल असे मला वाटते.
हा सागरी सेतू पूर्ण होण्यासाठी बराच विलंब लागला..
सेतूच्या बांधकामात काही अडचणी उभ्या ठाकल्या होत्या याची मला जाणीव आहे. मात्र अखेरीस हा सेतू प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला.
देशातील प्रख्यात राजकीय नेत्यांपैकी एक असलेले तसेच तुमचे वडील शंकररराव चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्रीपद भूषविले होते. सार्वजनिक जीवनात तुम्हीही अनेक वर्षांपासून सक्रिय आहात. प्रकल्पांच्या अंमलबजावणीत जी दिरंगाई होते, प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होण्याऐवजी त्यासाठी नऊ-नऊ वर्षे जातात, या सर्व स्थितीबाबत तुम्हाला काय वाटते?
एखादी गोष्ट अंमलात आणताना त्यात अनेक गोष्टी गुंतलेल्या असतात. स्थानिक लोकांचे त्या प्रकल्पाबाबत काही आक्षेप असतात ते देखील विचारात घ्यावे लागतात. या भागामध्ये राहाणारे कोळी, रहिवासी, कामगारवर्ग यांचेही काही प्रश्न होते. काही प्रश्नांची पुढाकार घेऊन उत्तरे शोधावी लागली. त्यासाठी सागरी सेतूच्या अलाईनमेंटमध्ये काही बदल करावे लागले. या व अशा मुद्दय़ांमुळे वांद्रे-वरळी सागरी सेतू विहित मुदतीत पूर्ण होऊ शकला नाही. मात्र सर्व अडचणींवर मात करून आता या सागरी सेतूचे काम पूर्ण झाले आहे.
अशा पद्धतीच्या कामाला मी बाबूजी धीरे चलना प्रवृत्ती म्हणतो..भारतामध्ये सर्वच गोष्टी अत्यंत धीम्या गतीने पार पडतात.
जर तुम्ही चीनमध्ये गेलात तर तुम्हाला वेगळी पद्धत आढळेल. तेथील सरकार निराळ्या पद्धतीने काम करते. चीनमध्ये लोकशाही नांदते की नाही हे मला माहित नाही, परंतु तेथे सर्व कामे व प्रकल्प पटकन पूर्ण होताना दिसतात. यामागचे खरे कारण असे की, एखाद्या सकाळी एक व्यक्ती येते आणि तुम्हाला सांगते की, तुम्ही राहताय ती जागा किंवा तुमच्या मालकीची असलेली जागा महिन्याभरात रिकामी करावी लागेल. त्याबदल्यात तुम्हाला भरपाई दिली जाईल. मात्र भारतामध्ये लोकशाही आहे. त्या पद्धतीचे सारे नियम पाळावेच लागतात.
लोकशाही व्यवस्था ही कार्यक्षमतेस मारक ठरतेय का?
काही वेळेस गंभीर प्रश्नही निर्माण होतात. मुंबई हे एक उत्तम शहर बनावे यासाठीच हे सारे प्रयत्न सुरू आहेत, पण ते करताना लोकांचे प्रश्न सोडविण्यावरही आमचा भर असतो. या प्रक्रियेत मुंबईकर भरडला जाऊ नये याचीही काळजी घ्यावी लागते.
सागरी सेतूच्या भविष्यातील पुढच्या टप्प्यांच्या बांधकामात दिरंगाई होऊ नये म्हणून भूतकाळातील घटनांपासून काही धडा घेतला आहे की नाही? सेतूच्या विस्तारीकरणाला सुरूवात करण्याआधीची मुलभूत तयारी अत्यंत पक्की आहे, याकडे लक्ष पुरविण्यात आले आहे की नाही?
अजून अनेक गोष्टींमध्ये सुधारणा करावयाची आहे, हा धडा आम्ही सागरी सेतू प्रकल्पाच्या बांधकामात उभ्या राहिलेल्या अडचणी तसेच झालेली दप्तरदिरंगाई यातून शिकलो. वरळी ते हाजी अली व ते नरिमन पॉईंटपर्यंत हा सागरी सेतू बांधण्यात येणार असून तो पूर्ण करण्याचा कालावधी कसा कमी करता येईल, या कामात दिरंगाई कशी होणार नाही याकडे आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.
अन्य सागरी सेतूंच्या बांधकामासाठीची कंत्राटे देण्याचा निर्णय कधीपर्यंत घेण्यात येईल?
वरळी ते हाजी अलीदरम्यानच्या सागरी सेतूच्या पुढच्या टप्प्यातील बांधकामांसाठी कंत्राटे देण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत नजिकच्या काळात निर्णय घेण्यात येईल. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी मुंबईत आल्या होत्या, तेव्हा मी त्यांची भेट घेतली होती. सागरी सेतूंची कामे जलदगतीने होऊ द्या असे त्यांनी सांगितले होते. सागरी सेतूच्या पुढच्या टप्प्यातील बांधकामांसाठी कंत्राटे देण्याबाबतची सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यावर आमचा कटाक्ष राहील. येत्या अडीच-तीन वर्षांच्या कालावधीत सागरी सेतूंच्या पुढील टप्प्यांतील काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
हाजी अली ते नरिमन पॉईंट या मार्गावरील सागरी सेतूच्या बांधकामासंदर्भातील प्रक्रिया साधारण कधीपासून सुरू होईल?
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. निवडणूक आचारसंहिताही लगेचच लागू होत असल्याने त्या दोन महिन्यांच्या कालावधीत हाजी अली ते नरिमन पॉईंट या मार्गावरील सागरी सेतूच्या बांधकामसंदर्भातील निर्णयप्रक्रियेला प्रारंभ होणे वा निर्णय घेतला जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे याबाबतचा निर्णय विधानसभा निवडणुकांनंतरच घेण्यात येईल. मात्र वरळी ते हाजी अली व हाजी अली ते नरिमन पॉईंट या दरम्यानच्या दोन्ही सागरी सेतूंच्या बांधकामाचा प्रारंभ एकाच वेळी होईल असा मला विश्वास वाटतो. या प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर आपण नरिमन पॉईंटपर्यंत विहित वेळेत लवकर पोहोचू शकू.
महाराष्ट्रात तुम्हाला पुन्हा सत्ता मिळाली तर या सागरी सेतूंची कामे मार्गी लावाल याची खात्री देऊ शकाल का?
आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर ही कामे नक्कीच मार्गी लावू. आम्ही अतिशय चांगली कामे केलेली आहेत, त्यामुळे पुन्हा सत्तेत येऊ अशी आम्हाला खात्री आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या यशाच्या पाठबळावरच काँग्रेस केंद्रामध्ये पुन्हा सत्तेत येऊ शकली. विकासासाठी कार्यरत असणाऱ्यांच्या बाजूनेच जनतेने कौल दिला होता.
प्महाराष्ट्रात तुम्हाला सत्तेत येण्याची जर खात्री वाटत असेल तर या दोन सागरी सेतूंच्या बांधकामांसंदर्भातील कंत्राटेही लवकर मंजूर शकाल याची खात्रीही तुम्ही देऊ शकता का?
असे आम्ही करू शकू असे वाटते.
कुठेही जा, लोकांना झारीतील शुक्राचार्याचा सामना करावा लागतो.
असे प्रकल्प सार्वजनिक व खासगी क्षेत्राच्या सहकार्यातून उभे राहात आहेत. टोल आकारणी हा पाया असलेले हे प्रकल्प आहेत. त्यामुळे मिळणाऱ्या प्रतिसादावर या प्रकल्पांची गती अवलंबून असते. जागतिक मंदीमुळे विविध क्षेत्रांत होणाऱ्या गुंतवणुकीच्या प्रमाणातही लक्षणीय घट झालेली आहे. मात्र या परिस्थितीवर आम्ही मात करू शकू असा मला विश्वास वाटतो.
आता मंदीचे सावट दूर होत आहे. पैसाही उपलब्ध आहे. मुंबईमध्ये पायाभूत सुविधांसाठी आता पैसा गुंतवावा का असा प्रश्न उभा राहातो. या प्रश्नामध्ये पर्यावरण तसेच अन्य मुलभूत मुद्दे गुंतलेले आहेत.
मुंबई हे आम्हाला जागतिक दर्जाचे शहर बनवायचे आहे. जागतिक स्तरावरील जीवनमानाप्रमाणेच मुंबईचे जीवनमान असावे असा आमचा प्रयत्न आहे. मुंबई हे आर्थिक केंद्र असावे ही या सर्वामागची मुलभूत कल्पना आहे.
हे सर्व प्रयत्न करताना तुम्ही विशिष्ट गटांशी संवाद साधलात का? जसे या शहरात उत्तम रस्ते बनविले जात आहेत. त्याच्यावरून गाडय़ा धावतात पण पुढे ट्रॅफिक जॅमची समस्या पाचवीला पुजलेली असते. अशा स्थितीबाबत मुंबईतील टॅक्सीचालकांशी कधी संवाद साधलात का? क्या प्रॉब्लेम है? वह बोलते है की लतादिदी फ्लायओव्हर बनते नही देखना चाहती.
मी याआधीच सांगितले की असे अनेक मुद्दे आमच्यासमोर आहेत. पण आपण जनसमुहाच्या हिताच्या मुद्यांबाबत प्राधान्याने विचार करू. फ्लायओव्हर झाल्याने दैनंदिन आयुष्यामध्ये काही अडचणी उभ्या राहातील अशी भावना काही व्यक्तींची झाली आहे.
लता मंगेशकर यांना विरोध करावा असे मुंबईत कोणालाही वाटत नाही. तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली आहे का?
नाही. जनहित लक्षात घेता, लतादिदीही आता याच दिशेने विचार करीत असतील असे मला वाटते. सारे प्रश्न सुटतील अशी मला आशा आहे.
तुम्ही लता मंगेशकर यांच्याशी संवाद साधलात का?
अजून मी त्यांच्याशी या विषयावर बोललेलो नाही. या प्रक्रियेत काही अडचणी येतील असे मला वाटत नाही.
भुयारी मार्ग व फ्लायओव्हर असे या सागरी सेतूंचे स्वरूप असेल असे आपल्याला वाटते का?
प्रियदर्शिनी पार्क व नेपिअन-सी रोड जवळ मोठा वळसा घेऊन तसेच राजभवन व तेथील टेकडीच्या उजव्या अंगाने वळसा घेऊन जाण्याऐवजी सागरी सेतूच्या बांधकामादरम्यान प्रियदर्शिनी पार्कापासून ते दुसऱ्या टोकाला बाबुलनाथ मंदिरापर्यंत भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. त्यामुळे नरिमन पॉईंडकडे जलदगतीने प्रवास करता येईल.
आपल्याला अल्पकाळासाठी मुख्यमंत्रीपद मिळालेले आहे. तुमची ‘बिगेस्ट सरप्राईजेस’ काय आहेत?
मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी अचानक माझ्याकडे आली. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना असे काही घडेल याची मी कल्पनाही केलेली नव्हती. मात्र २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासह अनेक मुद्दय़ांवर काँग्रेस पक्षाने चिंतन केले. त्यानंतरच पक्षनेतृत्वाने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली. अल्पकाळात खुप जबाबदाऱ्या खांद्यावर घेऊन निभावणे हे २०-२० मॅचसारखेच आहे. कमी वेळात तुम्हाला जास्तीत जास्त धावा काढायच्या असतात. अशाच प्रकारचे आव्हान माझ्यापुढे होते. मला माझ्या कर्तृत्वावर संपूर्ण विश्वास आहे. गेली वीस वर्षे सार्वजनिक क्षेत्रात मी कार्यरत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय घेताना त्या व्यक्तीचे काम व कर्तृत्व या दोहोंचाही विचार केला जातो. अशा पद्धतीनेच विचार करून पक्षनेतृत्वाने माझ्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपविली असणार.
आपण आधी कल्पना केली होती त्यापेक्षा मुख्यमंत्रीपदाचे काम कितीतरी पटीने अवघड आहे अशी जाणीव आपल्याला या पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर झाली का?
अगदी स्पष्टपणे सांगायचे तर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडणे ही वाटते तितकी अवघड गोष्ट नाही. आता प्रश्न कालावधीचा आहे. कमी कालावधीत खुप कामे करावयाची आहेत. त्यांची फलनिष्पत्ती उत्तम असायला हवी. मी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. लोकसभा निवडणुकांसाठीच्या आचारसंहितेत दोन महिने निघून गेले. विधानसभा निवडणुकांसाठी लागू झालेल्या आचारसंहितेत दोन महिने निघून जातील. असे चार महिने निघून गेल्यामुळे हाती जो काही अल्प कालावधी मिळेल त्यात जास्तीत जास्त महत्वपूर्ण निर्णय घेण्याचे धोरण आम्ही ठेवले आहे.
तुमच्यासमोर उभे ठाकलेले सर्वात मोठे आव्हान कोणते? कायदा व सुव्यवस्थेची स्थितीबाबतचे का?
हो. २६/११ च्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुकाबला करणे, ती नियंत्रणात आणणे याला आम्ही प्रथम प्राधान्य दिले. लोकांच्या विश्वासाला तडा गेला होता. महाराष्ट्राचे प्रशासन तसेच पोलीस यंत्रणेमध्ये आमुलाग्र सुधारणा करण्याची गरज असल्याचे लोक बोलू लागले होते. त्यामुळे अनेक बदल करावे लागले. काही गोष्टींची चौकशी करण्यात आली. पोलीस दल अधिक सामथ्र्यशाली करण्यासाठी पावले उचलण्यात आली.

पोलीस दलामध्ये किती प्रमाणात अनागोंदी माजली होती असे आपणास वाटते?
पोलीस दलामध्ये अनागोंदी माजली आहे असे मला वाटत नाही. पाकिस्तानच्या विरोधातील हे ‘प्रॉक्सी वॉर’ आहे. पाकिस्तानी नागरिक हे या कटामध्ये कसे सामील आहेत याची माहिती मुंबईवरील हल्ल्यादरम्यान जिवंत पकडलेल्या अतिरेक्याने आपल्या जबानीदरम्यान दिली आहे. दहतवाद्यांनी हल्ल्याचे ज्या पद्धतीने नियोजन केले, जी शस्त्रे वापरली त्यामुळे युद्धसदृश स्थिती निर्माण झाली. चोरी, दरोडे, खून अशा प्रकरणांचा तपास पोलीस सर्वसाधारणपणे करीत असतात. त्यांच्यासाठी ही स्थिती अगदीच निराळी होती.
महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये दुफळी माजली आहे. त्यांचे अनेक अंतर्गत प्रश्न आहेत.
पोलीस खात्यामध्ये कोण आणि कुठे नियुक्त होतो याबाबत मी वैयक्तिक आवडी-निवडी ठेवलेल्या नाहीत. प्रत्येक गोष्ट ही गुणवत्तेच्या आधारावरच व्हावी या मताचा मी आहे. काही प्रश्न आहेत व ते सोडविण्यासाठीही नुकतीच पावलेही उचलण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व गोष्टी नक्कीच सुरळीत होतील.
मुंबईला दहशतवाद्यांनी आता आपले लक्ष्य केले आहे. या पाश्र्वभूमीवर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी तुमच्या सरकारने कोणती पावले टाकली आहेत?
एनएसजीने आता प्रादेशिक स्तरावर केंद्र सुरू केले आहे. आमच्या इंटेलिजन्स अ‍ॅकॅडमीचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. या अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून भावी गुप्तचर अधिकाऱ्यांची भरती व प्रशिक्षण या प्रक्रिया पार पाडल्या जातील. अ‍ॅकॅडमीतील प्रशिक्षणार्थीना राज्यातील गुप्तचर अधिकारी शिकवितील. एमपीएसची माध्यमातून अशा अधिकाऱ्यांची भरती करण्याची आजवरची असलेली परंपरा बाजूला ठेवून इंटेलिजन्स अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून ही सर्व प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासंदर्भात खूप जलदगतीने निर्णय घेतले जात आहेत असे एकंदरीत दिसते.
होय. अत्याधुनिक शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी विदेशी एजन्सीजकडे ऑर्डर नोंदविण्यात आलेली आहे. अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सुरक्षा कौन्सिल स्थापन करण्यात आले आहे. सीआयएसएफसारखे राज्य औद्योगिक सुरक्षा दल राज्यात स्थापन करावे असा प्रस्तावही विचाराधीन आहे.
मुंबईत सर्वात मोठी समस्या अशी आहे की जेव्हा एखादे संकट उभे ठाकले की ते निवारण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात. जसे गुंडगिरी संपविण्यासाठी काही वर्षांपूर्वी पोलिसांनी एन्काऊंटर करण्याचा मार्ग शोधून काढला होता. संकटाचे निवारण झाले की यंत्रणा पुन्हा सुस्त होते. दहशतवादाविरोधात आता दीर्घकालीन युद्ध पुकारण्याची वेळ येऊन ठेपली आहे अशावेळी या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा असे तुम्हाला वाटते का?
प्रत्येक प्रश्नासाठी ‘टेलर-मेड’ उपाय असतातच असे नाही. या प्रश्नांची हाताळणी करणाऱ्या व्यक्तीच्या प्रकृतीधर्मानुसार उपाययोजनांचे स्वरूप अवलंबून असते. या सर्व उपाययोजना कायद्याचे भान राखूनच केल्या गेल्या पाहिजेत. घाईघाईने कोणतीही पावले टाकणे योग्य ठरणार नाही.
अशा काही प्रकरणांची चौकशी करण्याचा तुमचा मानस आहे का? कारण एन्काऊंटर घडविणाऱ्या अधिकाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. साळसकर हे देखील ‘एन्काऊंटर कॉप’ म्हणूनच ओळखले जात होते.
गुंड तसेच दहशतवाद्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांना आम्ही योग्य स्वातंत्र्य दिले नाही तर परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा करता येणार नाही. त्यामुळे पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे पण त्याचबरोबर अशी कारवाई करताना कायद्याची बूज राखली जाईल याचे भान त्या संबंधित अधिकाऱ्याने ठेवायला हवे.
आता पुन्हा राजकीय विषयांवरील प्रश्नांकडे वळू. विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून पुन्हा सत्तेवर येऊ अशी तुम्हाला खात्री आहे, परंतू हा विजय काँग्रेस पक्ष स्वबळावर मिळविणार की राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेल्या निवडणुक आघाडीच्या सहाय्याने..
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये राजकीय स्थिती वेगवेगळी आहे. काही ठिकाणी आम्ही अधिक शक्तिशाली आहोत तेथे आम्ही सहकारी पक्षांवर विसंबून राहाणार नाही. मात्र काही जिल्ह्यांमध्ये निश्चितच आमच्यापुढे काही प्रश्न नक्कीच आहेत. त्यामुळे सहकारी पक्षांकडून आम्हाला काही प्रमाणात नक्कीच मदत लागेल. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शक्तिशाली आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये या पक्षाची स्थिती दुबळी आहे.
सहकारी पक्षांशी असेलली आघाडी कायम ठेवावी यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात.
आघाडीबाबतचा निर्णय घेण्यासंदर्भातील बाब मी पक्षनेतृत्वावर सोडतो.
तुमच्या आधीचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी असे विधान केले आहे की, स्वबळावर निवडणुका मी अधिक पसंत करेन.
त्यांनी तसे करून दाखविले तर मला सर्वात जास्त आनंद होईल. मात्र आघाडी सरकार चालविताना अनेक मर्यादा येतात. मी आघाडीचे सरकार चालवित आहे, त्यामुळे मला त्यासंदर्भातील मर्यादांचे भान आहे.
शरद पवार हे तुमचे आदरणीय मित्र आहेतच की..
हो. प्रत्येक नेता आपला पक्ष मजबूत करायचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष कसा मजबूत होईल यासाठी मी ही प्रयत्न करणे स्वाभाविकच आहे. अगदी हीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला, कार्यकर्त्यांनाही लागू होते. माझ्या पक्षाचे हित जपण्यासाठी, माझ्या पक्षाच्या जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांना योग्य संधी उपलब्ध व्हावी यासाठी मी प्रयत्न करणे स्वाभाविक आहे. त्यामुळे सर्व गोष्टींचा निर्णय साकल्याने विचार करूनच घ्यायला हवा.
यूपीए पॅटर्ननूसार महाराष्ट्रात काँग्रेसने विधानसभा निवडणुकांत स्वबळावर लढायचे ठरविले तर तुम्ही दु:खी व्हाल ना?
माझे पक्षनेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल.
राज्यात विरोधी पक्षीयांची स्थिती कशी आहे? त्यांची स्थिती पाहून तुमच्या आनंदात भर पडते का?
अशोक चव्हाण - आम्हाला प्रबळ विरोधक उरलेले नाहीत. निवडणुका या युद्धासारख्याच असतात. ही अत्यंत कठीण प्रक्रिया असते. आमच्या सरकारने केलेली कामगिरी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही प्रभावीपणे मांडू. शिवसेना, भाजपसह अन्य कोणीही विरोधी पक्ष मला प्रभावी वाटत नाही.
आपल्या पूर्वसुरींची प्रशंसा करणाऱ्या दुर्मिळ राजकीय नेत्यांपैकी तुम्ही एक आहात?
मी असे का असू नये? माझे पूर्वसूरी हे काही माझे विरोधक नाहीत. माझे वडील शंकरराव चव्हाण हे ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्याआधी त्या पदावरून कोणाला तरी बाजूला सारण्यात आले असणार हे उघड आहे. जेव्हा त्यांनी राजीनामा दिला त्यावेळी मुख्यमंत्रीपदावर अन्य व्यक्तीची निवड झाली. ही सर्व प्रक्रिया मी फार जवळून पाहिली आहे. एखाद्या पदावर कोणी कायमचा राहात नाही हे मला अगदी व्यवस्थित माहित आहे.
आघाडी सरकारचा भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल आता बोलू. उदाहरणार्थ मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. मुंबईमधील डान्सबारवर कारवाई करण्यात व कायदा-सुव्यवस्थेच्या अन्य बाबी हाताळण्यात ते व्यग्र होते.
त्या गोष्टींवर मी कोणतेही भाष्य करणार नाही. मात्र आमच्या समोरील प्राधान्यक्रम निश्चित वेगळा आहे. मला मान्य आहे की अजून अनेक प्रश्न सोडवायचे आहेत. डान्सबार ही सामाजिक समस्या असून ती सोडविण्यासाठी तिच्याच पद्धतीने हाताळून उपाययोजना करण्यात यायला हवी. मुंबई व महाराष्ट्राचे रक्षण करणे तसेच पोलिस दल अधिक सामथ्र्यशाली करणे याला आम्ही आता सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
अजून काही गोष्टी प्राधान्यक्रमात असू शकतात असे शरद पवारही म्हणाले होते. केवळ डान्सबारच नाही तर अनेक बाबतीत महाराष्ट्र सरकार गोंधळलेले होते व उत्तम कारभाराची जबाबदारी पार विसरून गेले होते अशी भावना व्यक्त होत आहे.
वेगवेगळे मुद्दे हे त्या त्या वेळी उपस्थित झालेले असतात. त्या त्या वेळच्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्याप्रमाणे उपाययोजना करावी लागते. जनतेचे रक्षण करण्याकरिता आता प्राधान्याचा मुद्दा दहशतवादाशी मुकाबला करणे, गुप्तचर खात्याच्या कामाला कामाला गती देणे हा आहे.
भारतीय राजकीय नेत्यांचे वयोमान लक्षात घेता, ५० वर्षांहून थोडे अधिक वय असलेले तुम्ही त्या मांदियाळीतील अगदी तरुण नेते ठरता. काँग्रेस पक्षामध्ये आपले नेमके स्थान काय आहे असे तुम्हाला वाटते? राहुल गांधी यांच्या युवाफळीतील सहकाऱ्यांमध्ये (ज्याला युथब्रिगेड म्हटले जाते) स्वत:चा समावेश कराल की ज्येष्ठांच्या फळीत की गेली २० वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात व्यतित केल्यामुळे आपण मध्यम फळीतले आहोत अशी तुमची भावना आहे?
मी २६ वर्षांचा होतो त्यावेळची आठवण सांगतो. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना संसदेत प्रचंड बहुमत होते. १९८६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी मला उमेदवारी दिली होती. राजीव गांधी यांना मी माझा आदर्श मानतो. राहुल गांधी यांनी देखील मला खूप पाठिंबा दिला आणि त्यांच्या तरुण सहकाऱ्यांमध्ये माझा समावेश केला. मी स्वत:ला खूप तरूण किंवा खूप ज्येष्ठ असे मानणार नाही. मी या दोन्ही स्तरांमध्ये आहे. मी इतकेच म्हणू शकतो की माझ्याकडून आमच्या युवानेत्याला खुप मोठय़ा अपेक्षा आहेत. राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचे एक डायनॅमिक नेते म्हणून पाहिले जाते.
या लोकांमध्ये तुम्ही सहज सामावून गेला आहात की तुम्हाला अवघडल्यासारखे वाटते?
नाही, मी त्यांच्यात सहज सामावून गेलो आहे. तुमचे विचार हे स्पष्ट हवेत, तुमच्या कल्पनाही स्पष्ट असाव्यात. आम्ही एकमेकांशी उत्तम समन्वय साधून काम करतो.
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षामध्ये अनेक दिग्गज नेते आहेत पण या पक्षाला अवघी १८ टक्के मतेच मिळतात.
पक्षाची पुनर्बाधणी करणे आवश्यक असते. संघटनेमध्ये काही मुद्दे आहेत. प्रत्येक जिल्ह्यात पक्षसंघटना अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. असे अनेक प्रश्न आहेत जे सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
पण या साऱ्या बाबी तुमचे पक्षश्रेष्ठी समजून घेतात का?
महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेसची कामगिरी कशी होत आहे याचे पक्षश्रेष्ठी सातत्याने निरीक्षण करीत असतात. आता आम्ही विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज होत आहोत. या निवडणुकांमध्ये आम्हाला विजय मिळवायचाच आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशामुळे काँग्रेसमधील सर्वाचेच मनोबल उंचावण्यास मदत झाली आहे.
तरीही काँग्रेस पक्षाला अवघी १८ टक्केच मते मिळाली.
जे सत्य आहे ते मी कधीही नाकारत नाही. लोकसभा निवडणुकांमधील कामगिरीपेक्षा आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही अधिक सरस कामगिरी करू असा मला विश्वास आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तुम्हाला शुभेच्छा. या निवडणुकीत तुम्ही जिंकलात तर ‘वॉक द टॉक’ चा पुढील कार्यक्रम आपण सागरी सेतूच्या पूर्ण झालेल्या पुढील टप्प्यावरच (म्हणजे थेट नरिमन पॉईंटपर्यंतच्या) चित्रीत करू अशी मला आशा आहे.
धन्यवाद.
कसाबने दिलेला कबुलीजबाब आता साऱ्यांनाच माहिती आहे. न्यायालयाने काय करावे हे तुम्ही सांगणार नाही याची मला कल्पना आहे, मात्र या कबुलीजबाबाच्या अनुषंगाने काय कारवाई करायची याबाबत तुम्ही काही ठरविले आहे का?
कोणत्या परिस्थितीत हा कबुलीजबाब देण्यात आला याची मला कल्पना नाही. यामागे काही चाल आहे की आणखी काही याची मला कल्पना नाही. यामागचे हेतूही मला माहिती नाहीत. या कबुलीजबाबाची संबंधित यंत्रणांकडून छाननी करण्यात येत आहे. न्यायालयीन प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र अनेक लोकांचे बळी घेणाऱ्या, पोलीस अधिकाऱ्यांना मारणाऱ्या या दहशतवाद्यांना फाशी द्या अशी संतप्त भावना जनता व्यक्त करीत आहे. अत्यंत कठोरातील कठोर शिक्षा या दहशतवाद्यांना द्यावी अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे.
मुंबईवरील हल्लाप्रकरणातील दहशतवाद्यांना समजा फाशीची शिक्षा सुनावली गेली तरी तिच्या अंमलबजावणीत अफझल गुरूप्रकरणाप्रमाणे दिरंगाई होणार नाही हे कशावरून?
अफझल गुरू प्रकरणाची मी या प्रकरणाशी तुलना करणार नाही. सर्वोच्च पातळीवर सर्व निर्णय कायदेशीर बाजू पाहूनच होत असतात. मात्र तात्काळ न्याय मिळणे जनतेला अपेक्षित असते.
तुम्ही ही प्रक्रिया गतिमान करीत असालच..
आमच्या बाजूने कोणतीही अडचण नाही. मुंबई हल्लाप्रकरणात सहभागी असलेल्यांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही शक्य तितक्या लवकर पार पाडली. यासंदर्भात पोलीस खाते, न्याययंत्रणा, कायदेतज्ज्ञ यांनी कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे.
या खटल्याचा निकाल लागल्यानंतर कारवाईसंदर्भात सरकारकडून दिरंगाई होणारच नाही याची खात्री काय?
अशी दिरंगाई आमच्याकडून होण्याचे काही कारणच नाही.
सविस्तर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद.
( अनुवाद -समीर परांजपे)