Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

विविध

पायउतार होण्याबाबत आपण अडवाणी यांना सूचना दिलेल्या नाहीत-मोहनराव भागवत
नवी दिल्ली, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी

भाजपचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांच्याबरोबर झालेल्या भेटीत आपण त्यांना पायउतार होण्याबाबत कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत, असे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी एका खाजगी मराठी टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. सध्या लोकसभेत विरोधी पक्ष नेत्याची धुरा अडवाणी सांभाळत आहेत. भाजपमध्ये व लोकसभेत आपला उत्तराधिकारी तुम्हीच निवडा अशा कोणत्याही सूचना आपण त्यांना दिलेल्या नाहीत, असेही भागवत यांनी स्पष्ट केले.

गाझामधील चकमकीत २० जण ठार
गाझा सिटी, १५ ऑगस्ट / ए.एफ.पी.

हमास पोलीस व क्रट्टपंथीय इस्लामी गट यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत २० जण ठार तर १२० जण जखमी झाल्याचे पॅलेस्टिनी इमर्जन्सी सव्र्हिसतर्फे सांगण्यात आले. दक्षिण गाझा सिटीतील राफा येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या या चकमकीत उभय बाजूंमध्ये मोठय़ा प्रमाणात गोळीबार करण्यात आला. इस्लामिक अमिरातीची आम्ही घोषणा करीत अस्याचे अब्दुल लतिफ मुसा या इस्लामिक गटाच्या प्रतिनिधीने सांगितले. यावरूनच ही धुमश्चक्री उसळली. या चकमकीत हमासच्या दक्षिण गाझाचा प्रमुख मोहम्मद अल- शमाली हा ठार झाल्याचे सांगण्यात आले.

मेक्सिकोतील तुरुंगातील कैद्यांच्या दंगलीत १९ ठार
मेक्सिको सिटी, १५ ऑगस्ट / ए.एफ.पी.

मेक्सिकोच्या उत्तरेकडील गोमेझ पालासिओ शहरातील तुरुंगात कैद्यामध्ये शुक्रवारी झालेल्या दंगलीत किमान १९ जण ठार तर २६ जण जखमी झाल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.
तुरुंगामधील कैद्यांच्या टोळींमधील अंतर्गत वादामुळे हा प्रकार घडला. यापूर्वीही असा प्रकार अनेक महिने होत असून छोटय़ा मोठय़ा प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकंदर १५ जण ठार झाले होते. एकंदर एक हजार ८१ इतके कैदी या तुरुंगात असून तुरुंगातील वातावरण तणावग्रस्त आहे व हा एक प्रकराचा टाईमबॉम्बच असल्याचे सुरक्षा अधिकारी मानत आहेत. शुक्रवारपेक्षा आता वातारण शांत आहे.

काबूलमध्ये कार बॉम्बस्फोटात सात ठार
काबूल, १५ ऑगस्ट/ए.पी.

येथील ‘नाटो’ च्या मुख्यालयाबाहेर झालेल्या शक्तिशाली कार बॉम्बस्फोटात किमान सातजण ठार झाल्याचे वृत्त असून अनेकजणी जखमी झाले आहेत. स्फोटकांनी भरलेले वाहन धडकवून हा स्फोट घडवून आणल्याचे सूत्रांनी सांगितले. येथे असलेले अमेरिकन दूतावासाचे कार्यालय हेच स्फोटाचे मुख्य लक्ष्य असल्याचे सांगण्यात आले. या स्फोटानंतर येथे एकच पळापळ झाली. सर्वत्र रक्ताचे सडे पसरले होते. या स्फोटात अनेक वाहनांचे नुकसान झाले असून जवळच्या इमारतींना तडे गेले आहेत. नाटोचे मुख्यालय असलेल्या मार्गावरच अमेरिकचे दूतावास कार्यालय तसेच राष्ट्रपती भवनही आहे. तालिबान्यांनी या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली असून अमेरिकेच्या वाढत्या हस्तक्षेपाचा विरोध म्हणून हा स्फोट घडविल्याचे तालिबानी नेता झाबिहुल्ला मुजाहिद याने सांगितले.