१९५० ते १९७० हा हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळात आणि नंतरही भक्तिगीतातील वैराग्य, लावणीतला शृंगार, करुण गझल, अंगाईगीतातील वात्सल्य, भावविभोर गीते अशा विविध प्रकारच्या गाण्यांमधून आपल्या आवाजाचा अमीट ठसा उमटवला तो गानसम्राज्ञी लता मंगेशकर- अर्थात लतादीदींनी! वसंत देसाई, सी. रामचंद्र, स्नेहल भाटकर अशा मराठी मातीतील संगीतकारांबरोबरच उत्तर प्रदेशीय लोकसंगीत आणि हिंदुस्थानी शास्त्रीय बाजाचे संगीत घेऊन आलेले नौशाद, भव्य वाद्यवृंदासह अवघड शास्त्रीय रचनांना ओघवत्या शैलीत उतरवणारे शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, रवींद्र संगीताचा वापर करणारे हेमंतकुमार, कव्वाल्यांना मानमरातब मिळवून देणारे रोशन, बंगाली लोकगीतांबरोबरच विविध शास्त्रीय रचना देणारे सचिन देव बर्मन, आसामी लोकसंगीताची शैली ज्यांच्या संगीतात जाणवते ते सलील चौधरी, पाश्चात्त्य संगीताचा ढंग हिंदी चित्रपटांत आणणारे राहुल देव बर्मन, मधुर संगीताबद्दल ख्याती असलेले अनिल बिश्वास, द्रुतलय आवडणारे कल्याणजी-आनंदजी.. अशा अनेक संगीतकारांची गाणी लतादीदींनी गायली. हे संगीतकार, त्यांची लतादीदींनी गायलेली गाणी, ही गाणी आणि त्यांच्या संगीतातील सौंदर्यस्थळे यांचा रंजक आणि माहितीपूर्ण वेध घेणारे ‘स्वरसम्राज्ञी लता’ हे रत्नाकर फडके यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. लतादीदींनी गायलेल्या आणि रसिकमनांवर आजही गारूड करून असलेल्या अनेक गाण्यांचे रसग्रहण या पुस्तकात फडके यांनी केले आहे. ते करताना त्या-त्या संगीतकाराच्या संगीताची वैशिष्टय़े आणि आठवणीही त्यांनी सांगितल्या आहेत. भारताच्या विविध भागांतून आपापल्या मातीतले संगीत घेऊन आलेले संगीतकार आणि गानसम्राज्ञी लतादीदींचा आवाज यांच्यातील सुरेल नाते उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. हे नाते भारतीय सिनेसंगीतालाही समृद्ध करणारे कसे ठरले, ते हे पुस्तक वाचले की ध्यानात येईल. या संगीतसंचिताचे स्वररूप आकळण्यास आधी या पुस्तकातील त्याच्या शब्दरूपाकडे वळायलाच हवे!

‘स्वरसम्राज्ञी लता’

– रत्नाकर फडके,

संकेत प्रकाशन,

पृष्ठे- १६०, मूल्य- २७५ रुपये.