वंदना धर्माधिकारी यांचा ‘घायाळांची मोट’ हा कथासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे. याआधी त्यांचे ‘पालवी- अडगुलं मडगुलं ते पैलतीर’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यात काही कथांचा समावेश असला तरी तो कथासंग्रह नव्हता, ललित-वैचारिक लेखसंग्रह असे त्याचे स्वरूप होते. या पुस्तकानंतर धर्माधिकारी यांचा हा पहिलाच पूर्ण कथासंग्रह प्रकाशित झाला असून त्यात एकूण १५ कथांचा समावेश आहे. प्रामुख्याने जीवनातील अस्वस्थ- अस्थिरतेची अवस्था आणि स्त्रीत्वाचा अर्थ शोधू पाहणाऱ्या या कथा आहेत. नातेसंबंध, ते जपण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, त्यातून होणारे समज-गैरसमज आणि त्याचे व्यक्तीच्या मनावर उमटणारे प्रतिबिंब हे या कथांमागील सूत्र आहे.

‘घायाळांची मोट’ ही या संग्रहातील पहिलीच कथा रूढी, समाज, बंधने यांच्या पलीकडे जात प्रेमाला व्याख्यान्वित करणारी आहे. गद्य व पद्य यांच्याद्वारे गुंफलेली ही कथा आशय व रचनेच्या अंगानेही निराळी आहे. ‘मला आत्ताच कळलं’ ही संग्रहातील पुढची कथा एका स्त्रीच्या आयुष्याच्या उत्तरार्धात नव्या सहजीवनाच्या विचाराने होणारी घालमेल दाखवते. याशिवाय कॅन्सरसारख्या दुर्धर आजारात अखेरच्या काळात मनात साठलेले सर्व व्यक्त करून मोकळे होऊ इच्छिणाऱ्या गृहस्थाचे भावविश्व चितारणारी ‘मुलांनी दिलं बळं’ ही कथा असो किंवा एका कुटुंबाची शोकांतिका मांडणारी ‘एक पा वर दोन पा’ ही कथा असो, या साऱ्याच कथा वाचकाला अंतर्मुख करतात. संग्रहातील ‘मी तुझा नवराच बरा!’, ‘आजचं उद्यावर’, ‘राजहंस होऊन जा!’, ‘बहावा’ आदी कथाही वाचकाला गुंतवून ठेवतात. आजच्या गतिमान काळात आभासी जगात सारचे रममाण होत असताना खऱ्याखुऱ्या संवादाची गरज अधोरेखित करणाऱ्या या कथा आवर्जून वाचाव्या अशाच आहेत.

 ‘घायाळांची मोट’ – वंदना धर्माधिकारी,

एकविरा प्रकाशन,

पृष्ठे- १५२, मूल्य- २०० रुपये.