News Flash

शास्त्रज्ञाची रंजक चरित्रकथा

कार्ल लिनिअस’ हे डॉ. उमेश करंबेळकर यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.

‘सजीवांचा नामदाता! - कार्ल लिनिअस’ व ‘निंबोणीचं झाड’- मधुसूदन कालेलकर,

‘सजीवांचा नामदाता! – कार्ल लिनिअस’ हे डॉ. उमेश करंबेळकर यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक म्हणजे वर्गीकरणशास्त्राचा जनक कार्ल लिनिअसचे चरित्र. स्वीडनमध्ये अठराव्या शतकात जन्मलेला लिनिअस हा वनस्पतिशास्त्रज्ञ होताच, परंतु त्याला इतर अनेक शास्त्रांमध्येही गती होती. सजीवांच्या वर्गीकरणाची अनोखी आणि परिपूर्ण पद्धती शोधून लिनिअसने जीवशास्त्राला महत्त्वाचे योगदान दिले. त्याने सुरुवातीला सजीवांच्या वर्गीकरणाची ‘सोपानक्रम’ ही सर्वस्वी नवीन पद्धत शोधून काढली. त्याने शोधलेल्या या पद्धतीमुळेच त्याला वर्गीकरणशास्त्राचा जनक असे म्हटले जाते. पुढे त्याने वर्गीकरणानंतर सजीवांना शास्त्रीय नाव देण्याची ‘द्वीपद नामकरण’ पद्धतही शोधून काढली. त्याच्या या कार्याची माहिती या चरित्रातून येतेच; परंतु त्याचे बालपण, शिक्षण, वयाच्या पंचविसाव्या वर्षी वनस्पतींचे नमुने गोळा करण्यासाठी लापलँडसारख्या दुर्गम, बर्फाळ भागात केलेला सुमारे तीन हजार मैलांचा प्रवास, त्याचे लेखन, संशोधन, कुटुंबजीवन, समकालीन शास्त्रज्ञ अशा अनेक बाबींची रंजक माहितीही या चरित्रातून आली आहे.

‘सजीवांचा नामदाता! – कार्ल लिनिअस’

– डॉ. उमेश करंबेळकर,

राजहंस प्रकाशन,

पृष्ठे- १४५, मूल्य- १६० रुपये    

अजरामर गाण्यांचा संग्रह

नाटककार म्हणून मधुसूदन कालेलकर हे नाव अनेकांना परिचित आहे. त्यांनी पटकथा-संवादलेखन केलेले चित्रपटही अनेकांना आठवत असतील; परंतु त्यांनी अनेक गीतांचे लेखनही केले आहे, हे मात्र फारच थोडय़ा रसिकांना माहीत असेल. त्यांनी लिहिलेली गाणी लता मंगेशकर, आशा भोसले, भीमसेन जोशी, महेंद्र कपूर, हेमंतकुमार अशा अनेक दिग्गजांनी गायली. ‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई..’, ‘तू सुखकर्ता तू दु:खहर्ता’, ‘सूर तेच छेडीता गीत उमटले नवे..’, ‘पाहिले न मी तुला तू मला न पाहिले’, ‘सांग तुला कळणार कधी भाव माझ्या मनातला’ अशी त्यांतील अनेक गाणी चार-पाच दशकं उलटून गेली तरीही रसिकांच्या मनावर ठसा उमटवून आहेत. त्यांच्या अशा अजरामर गाण्यांचा ‘निंबोणीच्या झाडामागे’ हा संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. रमेश उदारे यांनी संपादित केलेल्या या संग्रहात कालेलकर यांनी लिहिलेली ६६ गाणी व चार नाटय़गीते संकलित केली आहेत. शिवाय कालेलकर यांचे बंधू अनंत कालेलकर, दिग्दर्शक दत्ता केशव, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे-नाईक, लेखिका गिरिजा कीर आदींचे आठवणीपर लेखही या संग्रहात आहेत. त्यामुळे संगीतप्रेमींसाठी हे पुस्तक संग्राह्य़ ठरणारे आहे.

‘निंबोणीचं झाड’- मधुसूदन कालेलकर,

अनघा प्रकाशन,

पृष्ठे- १६४, मूल्य- १८० रुपये  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2017 4:28 am

Web Title: latest marathi books arrival in market
Next Stories
1 अंतर्मुख करणाऱ्या कथा
2 तटस्थ कथावेध
3 आजच्या जगण्यातील ताणेबाणे
Just Now!
X