06 July 2020

News Flash

वाङ्मय-विवेचनाचा साक्षेपी आढावा

स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात ज्या नियतकालिकांनी मराठीतला ज्ञानव्यवहार सकस केला

स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात ज्या नियतकालिकांनी मराठीतला ज्ञानव्यवहार सकस केला, त्यात ‘नवभारत’ मासिकाला अग्रस्थान द्यावं लागेल. शंकरराव देव, आचार्य जावडेकर, आचार्य स. ज. भागवत, प्रा. वि. म. बेडेकर, हरि कृष्ण मोहनी अशांच्या पुढाकारातून सुरू झालेलं हे मासिक पुढील काळात मे. पुं. रेगे, वसंत पळशीकर, यशवंत सुमंत अशा विचारकांच्या संपादकीय कारकीर्दीत अधिक फुलले. महाराष्ट्रीय जीवन-संस्कृतीच्या विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवणाऱ्या ‘नवभारत’मधून विविध विषयांवर सखोल व गंभीरपणे लिहिले गेले. त्यातील केवळ मराठी वाङ्मयीन प्रवाह आणि साहित्य प्रकारांवरील लेखनाचा विवेचक आढावा घेणारे ‘‘नवभारत’ अंतर्गत साहित्याचे प्रवाह आणि प्रकार’ हे डॉ. प्रतिभा प्रदीप पाटणे यांचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. ‘नवभारत’मध्ये वाङ्मयविषयक तात्त्विक विवेचन करणारे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्या लेखनाची वर्गवारी साधारणपणे वाङ्मयीन प्रवाह व साहित्य प्रकारकेंद्री अशा दोन स्वरूपांत करता येईल. पुस्तकातही पहिला विभाग हा वाङ्मयीन प्रवाहांवरील लेखनाबाबत आहे, तर दुसरा विभाग हा साहित्य प्रकारांवरील समीक्षालेखनाचा आढावा घेणारा आहे. पहिल्या विभागात लोकसाहित्य, महानुभाव साहित्य, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय, बखर व शाहिरी वाङ्मय, मिशनऱ्यांचे साहित्य, ग्रामीण- दलित साहित्य अशा विविध वाङ्मयीन प्रवाहांविषयीच्या ‘नवभारत’मधील ऐतिहासिक आणि विश्लेषक लेखांचा आढावा घेण्यात आला आहे. तर दुसऱ्या विभागात काव्य, नाटक, कादंबरी, कथा, ललित गद्य, चरित्र-आत्मचरित्र या साहित्यप्रकारांवरील नवभारतीय समीक्षालेखनाचा वेध घेतलेला आहे. एकूणच स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील मराठी साहित्यविषयक चर्चाविश्वाचा पटच यातून उलगडला जातो. तो जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचावेच लागेल.

  • ‘‘नवभारत’ अंतर्गत साहित्याचे प्रवाह आणि प्रकार’- डॉ. प्रतिभा प्रदीप पाटणे,
  • स्नेहवर्धन प्रकाशन,
  • पृष्ठे- ११७, मूल्य- १३० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2018 12:09 am

Web Title: loksatta dakhal
Next Stories
1 मिझोरमचा वाटाडय़ा!
2 वाढदिवसाचा आराध्यवृक्ष
3 प्रेरणादायी आत्मकथन
Just Now!
X