‘चांगले आई-बाबा होऊ या!’ हे पुस्तक म्हणजे अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ डॅनियल ग्रीनबर्ग यांच्या बालसंगोपन या विषयावरील मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद होय. बालसंगोपन या विषयातील आजवरच्या ठरावीक दृष्टिकोनांपेक्षा संपूर्णपणे निराळ्या दृष्टीने पाहणाऱ्या ग्रीनबर्ग यांनी बालसंगोपनाविषयी सर्वच संस्कृती व समाजांना लागू पडतील अशा बाबींचे विवेचन या पुस्तकात केले आहे. पुस्तकातील पहिलेच प्रकरण बालसंगोपनाकडे पाहण्याचा ग्रीनबर्ग यांचा स्वतंत्र दृष्टिकोन सांगणारे आहे. मानवाची मूळची नैसर्गिक अवस्था, इतिहासातून मिळवलेला अनुभव आणि वैज्ञानिक कौशल्ये यांवर आधारित लोकशाही प्रवृत्तीचा ग्रीनबर्ग यांनी पुरस्कार केला आहे. एकीकडे व्यक्ती आणि समाज यांच्यातील समतोल व दुसरीकडे मुलांचे व्यक्तिस्वातंत्र्य जपणे या दोन्ही गोष्टींचा मेळ घालण्याकडे ग्रीनबर्ग यांचा कल आहे. तेच त्यांचे बालसंगोपनविषयक तत्त्वज्ञान आहे. पुस्तकातील उर्वरित १३ प्रकरणे याच तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने बालसंगोपनातील विविध बाबींचे विवेचन करणारी आहेत. ‘मूल हवं की नको’ यापेक्षाही ‘मूल का हवं आहे’ याचा विचार करणे अधिक गरजेचे आहे, असे प्रतिपादन ग्रीनबर्ग करतात. गरोदरपण, प्रसूतीच्या वेणा, स्तनपान या काळात आवश्यक मानसिक वृत्तींविषयीही ग्रीनबर्ग यांनी स्वतंत्र प्रकरणांमध्ये लिहिले आहे. तान्हे बालक, पुढे एक ते चार वयोगटातील बालक  आणि वय वर्ष चारच्या पुढील बालक अशा तीन टप्प्यांतील बालके व त्यांचे पालक यांच्यातील संवाद समस्यांविषयीही या पुस्तकात विवेचन केले गेले आहे. मुलांच्या आरोग्याकडे पाहण्याची पालकांची अतिकाळजीयुक्त दृष्टी ही मुलांच्या वाढीसाठी फारशी उपयोगी पडणारी नसून मुलांना स्वत:च्या अनुभवांतून शिकण्याची व स्वत:मध्ये सुधारणा करण्याची संधी द्यायला हवी, अशी मांडणी ग्रीनबर्ग यांनी केली आहे. याशिवाय मुलांची निद्रा, आहार आणि त्यांचे शिकणे यांविषयीही स्वतंत्र प्रकरणांमध्ये चर्चा करण्यात आली आहे. एकूणच पालकत्वाच्या रूढ संकल्पनांना दूर सारून त्याकडे पाहण्याची नवी समतोल दृष्टी देणारे हे पुस्तक पालकवर्गाने आवर्जून वाचावे असे आहे.

  • चांगले आई-बाबा होऊ या!’ – डॅनियल ग्रीनबर्ग, अनुवाद- सविता दामले,
  • मनोविकास प्रकाशन, पृष्ठे- १८२, मूल्य- १५० रुपये.

अर्धनागर जीवनाचे वास्तव चित्रण

‘ओंजळीतील सूर्य’ हा लेखक गो. द. पहिनकर यांचा तिसरा कथासंग्रह. मराठवाडय़ातील अर्धनागर जीवनाचे चित्रण करणाऱ्या कथा या संग्रहात वाचायला मिळतात. ‘ओंजळीतील सूर्य’ ही पहिलीच शीर्षककथा शेतीसंस्कृतीपासून परात्म झालेल्यांचे भावविश्व रेखाटते. तर नकोशा मुलींचे समाजवास्तव मांडणारी ‘आई’ ही कथा असो वा शहरात शिक्षणासाठी गेलेल्या मुलाचे आपल्या कुटुंबाशी, गावाशी तुटलेले नाते, त्यातून नातेसंबंध, ग्रामीण-शहरी संस्कृती आणि शिक्षण यांचे आजचे प्रातिनिधिक वास्तव सांगणारी ‘परका’ ही कथा असो; या संग्रहातील साऱ्याच कथा वाचकांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावतात. संग्रहातील ‘घोटाळ्यात घोटाळा’ या कथेत ग्रामीण भागातील राजकीय सारिपाटाच्या खेळाचे प्रत्ययकारी चित्रण आले आहे. तर स्वातंत्र्यसैनिक असलेले तत्त्वनिष्ठ वडील आणि मुलगा यांच्यातील मूल्यसंघर्षांचे चित्रण ‘उपरती’ या कथेत आले आहे. याशिवाय ‘कथा एका कवीच्या प्रतिभेची’, ‘पण लक्षात कोण घेतो?’ या कथाही वाचनीय आहेत. एकूण १४ कथांचा हा संग्रह नेटके संवाद आणि वास्तववादी चित्रणामुळे वाचकमनाचा ठाव घेणारा आहे.

  • ओंजळीतील सूर्य’- गो. द. पहिनकर
  • साकेत प्रकाशन, पृष्ठे- १८४, मूल्य- २०० रुपये.