आचार्य अत्रेंनी साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकावर चित्रपट केला. त्याला राष्ट्रीय सुवर्णपदक मिळाले. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका केली होती माधव वझे यांनी. ‘श्यामची आई’ने त्यांना ओळख मिळाली आणि ती त्यांची आयुष्यभराची शिदोरी ठरली. त्यांनी या चित्रपटकाळातील आपला स्मृतिपट ‘‘श्यामची आई’, आचार्य अत्रे आणि मी’ या पुस्तकात उलगडून दाखविला आहे.

पुण्यातील एका मध्यमवर्गीय घरातील माधव वझे हे हुशार विद्यार्थी होते. घरी भावंडांसह येणाऱ्या पाहुण्यांना नकला करून दाखव, कधी शाळेमध्ये अभिनय करून दाखव असे त्यांचे नेहमीच चालत असे. ‘श्यामची आई’ चित्रपटात श्यामच्या भूमिकेसाठी माधव वझे यांचे नाव अत्रेंना कोणी तरी सुचवते आणि अत्रे थेट त्यांच्या घरी येऊन धडकतात. ते छोटय़ा माधवला घेऊन मुंबईला येतात. त्यानंतर माधव वझेंचे आयुष्य एक वर्षांसाठी श्यामच्याच व्यक्तिरेखेत जाते. अत्रे यांचे लिखाण व त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंची ओळख या चित्रपटाच्या निमित्ताने वझे यांना झाली. त्याबद्दल पुस्तकात वाचायला मिळते. चित्रपटाच्या निमित्ताने आलेले अनेक अनुभवही वझे यांनी प्रांजळपणे लिहिले आहेत. आचार्य अत्रे, वनमाला, बाबूराव पेंढारकर, सरस्वतीबाई बोडस, तसेच चित्रपटातील अन्य कलावंतांसोबतच्या आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरची लोकप्रियता, राष्ट्रपती पुरस्काराच्या निमित्ताने दिल्ली प्रवास, तेथील हॉटेलमधील वास्तव्य आणि अत्रे-वनमाला यांच्यातील संबंध या साऱ्याचे वर्णन वझे यांनी अत्यंत संयत पद्धतीने केले आहे. चित्रपट क्षेत्रातील बदलती परिस्थितीही त्यांनी जवळून अनुभवली. कालांतराने नाटय़ समीक्षेकडे ते वळले असले तरी ‘श्यामची आई’मधील ‘श्याम’ अशीच त्यांची ओळख ठळक का आहे, याचे उत्तर या पुस्तकातून नक्कीच मिळते.

‘‘श्यामची आई’, आचार्य अत्रे आणि मी’

– माधव वझे,

राजहंस प्रकाशन, पुणे,

पृष्ठे- १३८, मूल्य- १८० रुपये.