30 May 2020

News Flash

उपहासगर्भ तरी उद्बोधक गजाली

समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी आपल्या शिक्षकी पेशाचा पुरेपूर वापर केला आहे.

स्तंभलेखन हे साधारणपणे प्रासंगिक घटनांवर आधारित असते. कधी त्या स्तंभामधून वाचकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न होतो तर कधी लेखक स्वत:च्याच मनातील वैचारिक वादळामधून एखादा विषय वाचकांपुढे मांडतो. अर्थात स्तंभलिखाण हे नेहमीच एखाद्या विषयाला धरून असते आणि ते वाचकांना विचारप्रवृत्त करत असते. डॉ. दत्ता पवार यांनीही आपल्या ‘चांदण्यातील गजाली’ या विविध वृत्तपत्रांतील स्तंभलेखांच्या संग्रहातून वाचकांशी संवाद साधला आहे. त्यांचे हे दुसरे ललित लेखांचे पुस्तक. १९५८ पासून विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून त्यांचे स्तंभलेख प्रसिद्ध होत आहेत. हे सर्व लेख एकत्र करून त्यांची ही गजाली म्हणजेच चांदण्यातल्या गप्पा साकारल्या आहेत.

उपहास आणि उपरोध यांचा बेमालूम वापर करताना वक्रोक्तीपूर्ण लिखाण करत त्यांनी आपल्या लेखांमधून अनेक कोपरखळ्या मारल्या आहेत. मात्र त्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही, याचीही काळजी त्यांनी घेतली आहे. वास्तवतेचे दर्शन घडवतानाच, त्यावर भाष्य करताना त्यांनी कोणावरही वैयक्तिक टीकेचा आसूड उगारलेला नाही आणि तरीही त्यांचे स्तंभ वाचनीय, मननीय आणि चिंतनीय झाले आहेत.

समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी आपल्या शिक्षकी पेशाचा पुरेपूर वापर केला आहे. मुलांना ज्याप्रमाणे शिकवताना विषय समजावून सांगावा त्याप्रमाणेच त्यांनी प्रासंगिक विषयावर भाष्य करताना, मनातील खळबळ व्यक्त करताना विषयाचे गांभीर्य जराही ढळू न देता संवाद साधला आहे. ‘नामांतराचं गाजर (की सत्तेचं) ’, ‘या देशाचं काही खरं नाही!’, ‘डंकेलसाहेब’, ‘वस्त्रहरण’, ‘गणपती दूध पितो’, ‘राजकारण गेलं चुलीत’ आदी यातील लेख याची उदाहरणं ठरतील. उपहासगर्भ शैलीत केलेल्या या लिखाणातून स्त्रीपुरुषसंबंध, राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अंधश्रद्धा, शिक्षण अशा विविध बाबींवर त्यांनी चिकित्सक भाष्य केले आहे. त्यांचे हे स्तंभलेखन वाचायची संधी न मिळालेल्या वाचकांसाठी या उपहासगर्भ तरीही उद्बोधक गजालींचा संग्रह नक्कीच वाचनीय आहे.

 ‘चांदण्यातल्या गजाली’- डॉ. दत्ता पवार,

 साहित्यसंवाद प्रकाशन,

पृष्ठे – १३२, मूल्य – १५० रुपये

 

स्त्री-मनाचा शोध घेणाऱ्या कथा

ग्रामीण भागातून निमशहरी भागात नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरित झालेला एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे. आपली ग्रामीण मुळे सोडू न शकलेला आणि पुन्हा शहरी संस्कृतीच्या कचाटय़ात अपरिहार्यपणे सापडलेला हा वर्ग आहे. ‘पुनित’ हा लेखिका पी. ए. आत्तार यांचा कथासंग्रह अशाच पेचात सापडलेल्या वर्गाचे भावविश्व आपल्यासमोर मांडतो. विशेषत: स्त्रीच्या, त्यातही ग्रामीण स्त्रीच्या आयुष्याचे सूक्ष्म धागे यातील कथा उलगडत जातात. संसार, विचार, संस्कृती, रूढी, परंपरा या बंधनात अडकणारी, तरीही त्याग, ममता, प्रेम भरभरून देणारी स्त्री लेखिकेच्या कथांमधून दिसते. शिक्षिका व समुपदेशक अशी दुहेरी भूमिका निभावणाऱ्या लेखिकेला स्त्रियांचे दु:ख, समस्या, व्यथा जवळून पाहता आल्या. त्यातूनच या कथा लेखिकेच्या मनात फुलत गेल्या. पुनीत म्हणजे पवित्र, निर्मळ. याच निर्मळतेने, वात्सल्याने स्त्री अनेक नाती निभावत असते. त्या नात्यांमधील बंध या कथांमधून दिसून येतात. स्त्रियांचे दु:ख, वेदना, संवेदना कमी करणे, किंबहुना ते हलके करण्याची आस बाळगत लेखिका स्त्री-मनाचे विविध पैलू उलगडून दाखवते. या संग्रहातील ‘देवदूत’, ‘आई : एक जीवनसारथी’, ‘पोरकी’, ‘समुपदेशनाच्या चष्म्यातून’, ‘कवडसा’, ‘सिंधू’, ‘कुंपण’, ‘मुलगी आहे म्हणून’ यांसारख्या कथा स्त्री-मनाचा शोध घेणाऱ्या आहेत.

‘पुनीत’- पी. ए. आत्तार,

ग्रंथाली प्रकाशन,

पृष्ठे – ११०, मूल्य – १२५ रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2016 4:13 am

Web Title: new arrivals marathi books review
Next Stories
1 ग्रामीण आणि लोकसाहित्याचा चिकित्सक आढावा
2 ग्रामीण वास्तवाचा वेध                  
3 विकासाचे आत्मभान
Just Now!
X