तीन दशकांपूर्वी एक मराठी माणूस व्यवसायाची कोणतीही कौटुंबिक पाश्र्वभूमी नसताना हॉटेल व्यवसायात येतो, इतकेच नव्हे तर त्यात आपल्या नावाचा ठसा उमटवतो, हे तसे अनोखेच. ती मराठी व्यक्ती म्हणजे राहुल लिमये. त्यांचे ‘जिप्सी’ हे मुंबईतील दादर येथील रेस्टॉरंट गेल्या तीन दशकांपासून खवय्यांच्या जगात आपली नाममुद्रा उमटवून आहे. लिमये यांचा हा प्रवास नेमका कसा झाला हे सांगणारे ‘निमित्त.. जिप्सी शिवाजी पार्क’ हे त्यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे. ‘यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेल्या बहुतेक व्यक्तींनी त्यांच्या सुरुवातीच्या काळातलं आयुष्य रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा फुटपाथवर काढलेलं होतं असं आपण ऐकत असतो. ते खरं असेलही, पण माझ्या बाबतीत मात्र असं काहीही घडलेलं नाही. नशिबाने मला योग्य वेळी योग्य संधी मिळत गेली आणि मी माझ्या मेहनतीनं त्या संधीला योग्य न्याय दिला,’ असे लेखकाने सुरुवातीलाच प्रांजळपणे सांगून टाकले आहे.

पुस्तकाच्या पहिल्या भागात लेखकाने आपले बालपण ते उमेदवारीचा काळ रेखाटला आहे. त्यानंतर ‘ड्रमबिट’ या रेस्टॉरंटविषयी लेखकाने लिहिले आहे. त्यात लेखकाने बाळासाहेब ठाकरेंची खप्पामर्जी ओढवून घेण्याचा प्रसंग कसा आला ते सांगितले आहे. त्या प्रसंगानंतर लेखक ‘जिप्सी’, ‘नेब्युला’ या रेस्टॉरंटच्या उभारणीविषयी लिहितो. कोणत्याही क्षेत्रातील नव्या व्यावसायिकाला ते वाचून प्रेरणा मिळू शकेल. मेहनत, नावीन्य यांच्या जोरावर लेखक आपल्या व्यवसायात यशस्वी होतो. पुढे लेखकाने आपले कुटुंबीय तसेच व्यवसायामुळे कलाकार मंडळींशी झालेल्या मैत्रीविषयी लिहिले आहे. शेवटच्या भागात हॉटेल व्यवसायाविषयी लेखक आपले चिंतन मांडतो. एका यशस्वी रेस्टॉरेंटियरचा हा विलक्षण प्रवास नक्कीच वाचनीय आहे.

‘ निमित्त.. जिप्सी शिवाजी पार्क’

– राहुल लिमये, राजहंस प्रकाशन, 

पृष्ठे – १४२ ,

मूल्य – २५० रुपये   

कर्णबधिरांच्या उत्थानाचा मार्गदर्शक

कर्णबधिरांसाठी गेली चाळीस वर्ष काम करणाऱ्या उषा धर्माधिकारी यांचे ‘DEAF असलो तरीही..’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. समाजाशी संपर्क साधण्याचे अत्यावश्यक माध्यम (बोलणे व ऐकणे) ज्यांच्याजवळ नसेल अशांच्या मानसिक, बौद्धिक, सामाजिक गरजा कशा पूर्ण करायच्या, या प्रश्नातून लेखिका कर्णबधिरांच्या समस्यांकडे वळल्या. त्यांच्या दीर्घ अनुभवातून हे पुस्तक साकारले आहे. कर्णबधिरांच्या प्रश्नांविषयी, त्यांच्या पालकांना भेडसावणाऱ्या अशा पाल्यांच्या संगोपनाबाबतच्या समस्यांविषयी समाजमनात तसेच संस्थात्मक पातळीवरीही फारशी आस्था नाही. अशात कर्णबधिरांचा शारीरिक, मानसिक तसेच सामाजिकदृष्टय़ा विकास कसा करता येईल यासंबंधी समग्र माहिती देणारे हे पुस्तक आहे. ते तीन भागांत विभागलेले असून त्यात कथा, लेख, कविता, किस्से यांचाही समावेश आहे.

‘DEAF असलो तरीही..’

– उषा धर्माधिकारी,

ग्रंथाली प्रकाशन,

पृष्ठे – १२८,

मूल्य – १५० रुपये