अभिनेते विवेक यांच्या जन्मशताब्दीची सुरुवात २३ फेब्रुवारीला झाली. त्याचेच औचित्य साधून त्यांचा जीवनपट उलगडून सांगणारे व त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देणारे ‘अभिनेता विवेक’ हे पुस्तक सांगाती प्रकाशनातर्फे नुकतेच प्रकाशित झाले आहे. भारती मोरे, प्रभाकर भिडे, रविप्रकाश कुलकर्णी व प्रकाश चांदे यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात विवेक यांच्याविषयी विविध स्वरूपाची माहिती मिळते. विवेक हे मराठी कृष्णधवल चित्रपटांच्या काळातील अभिनेते. देखणे, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि सहजसुंदर अभिनय यामुळे सिनेरसिकांमध्ये त्यांना विशेष आदराचे स्थान होते. गणेश अभ्यंकर हे त्यांचे मूळ नाव. १९४४ साली आलेल्या ‘भक्तीचा मळा’ या चित्रपटाने त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. पुढे १९५० साली आलेल्या ‘बायको पाहिजे’ या चित्रपटापासून त्यांचे ‘विवेक’ असे नामकरण झाले आणि तेच पुढे रूढ झाले. सुमारे ८० सिनेमे आणि दहा नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला. त्यांच्या या कलाप्रवासाचा या पुस्तकातून वेध घेण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांच्या डायरीतील काही नोंदी, त्यांचे मित्र व सहकलाकारांच्या आठवणीही यात वाचायला मिळतात. एकूणच या पुस्तकामुळे अभिनेते विवेक यांच्याविषयी एक महत्त्वाचा दस्तावेज रसिकांसाठी उपलब्ध झाला आहे.

‘अभिनेता विवेक’

सांगाती प्रकाशन,

पृष्ठे- १४४, मूल्य- १७५ रुपये.  

जीवनमूल्यांचा शोध घेणारी कविता

‘हिरोशिमा’ व ‘आंदोली’ हे कथासंग्रह आणि ‘तुझे काही..माझे काही’ या कवितासंग्रहानंतर कवी मो. ज. मुठाळ यांचा ‘रानोमाळ’ हा नवा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या संग्रहाच्या मनोगतात मुठाळ यांनी आपल्या कवितेची निर्मितीप्रक्रिया मांडली आहे. त्यात ते म्हणतात, ‘जाणिवे-नेणिवेच्या भावनेमधून कवितेची निर्मिती होत असते. ही निर्मिती होत असताना कवी अनेक पातळ्यांवर शब्दांचा शोध घेत असतो, अनेक पातळ्यांवर जीवनामध्ये संघर्ष करीत असतो. त्याचा अपरिहार्य परिणाम त्याच्या शब्दांमध्ये निर्माण होत असतो. कधी ही निर्मिती पारंपरिक स्वरूपात असते, तर कधी बंडखोरीच्या स्वरूपाची असते.’ मुठाळ यांची या संग्रहातील कविता वाचली की त्यांच्या या म्हणण्याचा प्रत्यय येतो.

भवतालात दिसणाऱ्या विषमता, अन्यायामुळे अस्वस्थ झालेल्या कविमनाचा संघर्ष या कवितेत जाणवत राहतो. हा संघर्ष जसा समष्टीशी आहे, तसाच को स्वत:शीही आहे. एकीकडे या संघर्षांचे चित्रण, तर दुसरीकडे सत्य, समानता, मानवता, विश्वात्मकता या मानवी जीवनमूल्यांचा शोध ही कविता घेते. या मूल्यांचे आकर्षण कविमनाला आहे. त्यांच्या अनुभूतीने आनंदीत झालेले कविमन या कवितांमधून दिसत राहते. या संग्रहात एकूण ७८ कवितांचा समावेश आहे. या साऱ्या कविता मुठाळ यांनी याच सूत्रात गुंफल्या आहेत. ही कविता कविच्या मनाचे द्वंद्व जसे मांडते, तसेच ती जीवनानुभवातून साकार झालेले चिंतनही मांडते. त्यामुळे या संग्रहाचा आस्वाद आवर्जून घ्यायला हवा.

‘रानोमाळ’- मो. ज. मुठाळ,

स्नेहवर्धन प्रकाशन,

पृष्ठे- १०२, मूल्य- १०० रुपये  

दिग्गजांच्या आठवणी

‘सुनहरी यादें’ हे रामदास कामत यांचे नवे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. सिनेजगतातील  मान्यवरांच्या मुलाखतींवर आधारित लेखांचा हा संग्रह. याआधी ‘फ्लॅशबॅक’ व ‘आम्ही बी-घडलो’ या त्यांच्या दोन पुस्तकांमधूनही कामत यांनी सिनेजगतातील मान्यवरांवर लिहिले होते. त्यानंतर आलेल्या या संग्रहातही कामत यांनी अशाच काही मान्यवरांवर लिहिले आहे. त्यात दारासिंग, मा. भगवान, प्रेम चोप्रा, जॉनी वॉकर, जगदीप या कलाकारांवरील तसेच गायक महेंद्र कपूर आणि संगीतकार रवींद्र जैन यांच्यावरील लेखांचा समावेश आहे. सुमारे सहा दशकांपूर्वी कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या या कलावंतांबद्दल आजही अनेकांच्या मनात हळवा कोपरा आहे. चित्रपट क्षेत्राच्या इतिहासातील एक काळ या कलावंतांनी भारून टाकला होता. त्यांची कलाकीर्द समृद्ध होतीच, अन् तिने रसिकांनाही निर्भेळ आनंद दिला. त्यामुळेच जुन्या-जाणत्या सिनेरसिकांना आजही या कलावंतांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. अशांसाठी हे पुस्तक म्हणजे पर्वणीच. या संग्रहातील लेखांमधून त्या, त्या कलाकाराच्या कारकीर्दीविषयी सविस्तर माहिती मिळतेच; शिवाय आजवर अनेकांना माहीत नसलेल्या काही बाबी, घटना, किस्से यांविषयीही कळते. चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटविणाऱ्या या दिग्गजांवरील हे लेखन त्यामुळेच अधिक वाचनीय झाले आहे.

‘सुनहरी यादें’- रामदास कामत,

पार्टनर पब्लिकेशन,

पृष्ठे- १६०, मूल्य- २५० रुपये.