सु. ल. खुटवड हे नाव विनोदी लेखन वाचणाऱ्यांमध्ये परिचयाचं आहे. गेल्या दोनेक दशकांपासून ते विनोदी लेखन करत आहेत. ‘फुकटचा ताप’, ‘फ.फ. फजितीचा’, ‘मैफल किश्शांची’ अशी त्यांची काही पुस्तके वाचकांना ठाऊक असतीलच. शिवाय विविध नियतकालिकांमधून त्यांचे लेखन प्रकाशित होत असतेच. त्यातील ‘आवाज’ आणि ‘जत्रा’ या दोन दिवाळी अंकांतून गेल्या काही वर्षांत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कथांचा ‘नस्त्या उचापती’ हा नवा संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. विनोदी लेखन म्हटले म्हणजे त्यातून हास्यरस ओसंडून वाहायलाच हवा, अशी अपेक्षा असते. या कथाही त्या रसाची अनुभूती देतातच, पण त्याबरोबरच त्या कारुण्यही दाखवणाऱ्या आहेत. हे या संग्रहाचे बलस्थान आहे. सर्वसामान्य माणसांच्या जगण्यात येणारे अनुभव, त्या अनुभवांना दिला जाणारा प्रतिसाद व त्यातून निर्माण होणारा कारुण्यमय विनोद हे या संग्रहातील कथांचे सूत्र आहे. त्या दृष्टीने ‘आजारीपणाचं कौतुक’, ‘न ठरणाऱ्या लग्नाची गोष्ट’, ‘बाईलवेडा’, ‘छडी लागे छमछम’, ‘सुखी माणसाचा सदरा’, ‘सुडाचा फायदा’ यांसारख्या यातील कथा वाचनीय आहेत. एकूण १७ कथांच्या या संग्रहात प्रसंगानुरूप चित्रांचाही समावेश असल्याने कथास्वादाचा आनंद आणखीच वाढतो.

‘नस्त्या उचापती’- सु. ल. खुटवड, मेनका प्रकाशन, पुणे,

पृष्ठे- १५८, मूल्य- १७५ रुपये.  

 

वेदनेचा हुंकार व्यक्त करणारी कविता

‘कविता मनातल्या, कविता कोर्टातल्या’ हा मृदुला भाटकर यांचा कवितासंग्रह ‘ग्रंथाली प्रकाशना’तर्फे प्रकाशित झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश असणाऱ्या मृदुला भाटकर यांचा हा पहिलाच कवितासंग्रह. त्यातील पहिल्याच कवितेत- ‘तर्क निकषाच्या/ वादळात/ विवादाच्या/ उन्हात/ वस्त्र रेशमी/ गेली गळून/ वाळून/ मन उभं/ आता उघडं/ फक्त/ कवितेचं/ घालून/ चिरगूट’- अशा शब्दांत त्यांनी आपले कवितेबरोबरचे नाते उलगडून सांगितले आहे. संग्रहाच्या पूर्वार्धात प्रेम, मानवी जगणे, त्यातील गुंतागुंत आदी विषयांवरील एकूण २६ कविता वाचायला मिळतात. तर संग्रहाचा उत्तरार्ध हा ‘कोर्टातील कवितां’चा आहे. त्यात न्यायालयातील कामकाज, तिथली भाषा, तिथले अनुभव मांडणाऱ्या १५ कवितांचा समावेश आहे. ‘प्रत्येक माणसात असतोच न्यायाधीश/ पण/ ठेवावा लागतो जिवंत/ न्यायाधीशातला माणूस’ असे म्हणत ही कविता माणूस आणि न्यायाधीश यांच्यातील द्वंद्व, त्यांच्यातील वाद-संवाद प्रांजळपणे मांडतेच, परंतु ती मानवी जगण्यातील वेदनेचा हुंकारही व्यक्त करते. त्यामुळेच ती आस्वाद्य ठरते.

‘कविता मनातल्या, कविता कोर्टातल्या’ – मृदुला भाटकर,

ग्रंथाली प्रकाशन,  पृष्ठे- ४८, मूल्य- ६० रुपये.