तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार आणि शारदा चिटफंड घोटाळ्यातील आरोपी कुणाल घोष यांनी प्रेसिडन्सी कारागृहात झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रकृतीला असलेला धोका टळल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घोटाळ्यात सामील असलेल्या बडय़ा धेंडांविरुद्ध सीबीआयने कारवाई केली नाही तर आत्महत्येचा इशारा घोष यांनी दिला होता.
घोष यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याने गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर अधिक पाळत ठेवण्यात येत होती. घोष झोपण्यास जाण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्यात आली होती. तेव्हा त्यांच्याजवळ झोपेच्या गोळ्या नव्हत्या. मात्र रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. आपण झोपेच्या गोळ्या सेवन केल्याचा दावा त्यांनी केला, असे कारागृहाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
या प्रकाराबद्दल सीबीआयनेही तीव्र चिंता व्यक्त केली आहे.  घोष यांच्याकडे झोपेच्या गोळ्या कशा आल्या याबाबत सीबीआय चौकशी करणार आहे.
तुरुंग अधीक्षक निलंबित
या प्रकरणावरून प्रेसिडेन्सी कारागृहाचे अधीक्षक, डॉक्टर आणि त्या वेळी कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने एक समिती स्थापन केली आहे.
विरोधकांची टीका
कुणाल घोष यांनी भर न्यायालयात आत्महत्येचा इशारा दिला असतानाही सरकार बेफिकीर राहिले. याचा अर्थ सरकार घोष यांच्या मरणावर टपले होते असा होतो, असा आरोप काँग्रेसने केला आहे.