भारत-श्रीलंका या देशात नागरी अणुकरार झाला असला तरी भारताला श्रीलंकेच्या परिसरात अणुकचरा टाकू देणार नाही, असे त्या देशाचे वीज व ऊर्जा मंत्री चंपिका राणावाका यांनी सांगितले.
किरणोत्सर्गी कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे अधिकार भारताला देण्यात येणार नाहीत. श्रीलंकेच्या परिसरातील भारतीय अणुप्रकल्पात निर्माण होणारा कचरा या भागात टाकता येणार नाही असे त्यांनी सूचित केले.
१६ फेब्रुवारीला भारत व श्रीलंका यांच्यात अणुकरार झाला असून त्याचा वापर शांततामय मार्गाने अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जाणार आहे. त्यावर श्रीलंकेचे मंत्री प्रतिक्रिया व्यक्त करीत होते. भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान बहुपक्षीय करारनामे झालेले असून त्याच्या आधारे  हा अणुऊर्जा करार करण्यात आला आहे. अणु उपयोजनासाठी श्रीलंका पाकिस्तानबरोबर समझोता करार करील असे राणावाका यांनी सूचिक केले. तशाच पद्धतीचा करार रशियाच्या अणु आस्थापनेशी करण्यात येण्याची शक्यता आहे.