‘सीरम’ची लसनिर्मितीची योजना 

लंडन: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील शिखर बैठकीपूर्वी १ अब्ज ब्रिटिश पौंड  गुंतवणुकीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये ६५०० रोजगार निर्माण होणार आहेत. मंगळवारी दोन्ही नेत्यांमध्ये शिखर बैठक होत आहे.

डाउनिंग स्ट्रीट कार्यालयाने सोमवारी सायंकाळी विस्तृत व्यापार भागीदारी करारातून अपेक्षित गुंतवणुकीचे निष्कर्ष जाहीर केले असून या करारांना दोन्ही नेते आभासी मान्यता देणार आहेत.

व्यापार करारातून ब्रिटन व भारत यांच्यातील गुंतवणूक २०३० पर्यंत दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांच्या दरम्यान प्रत्यक्ष चर्चेच्या वेळी मुक्त व्यापार कराराचा मार्ग प्रशस्त होण्याची शक्यता आहे. भारत व ब्रिटन यांच्यादरम्यान आर्थिक संबंध अधिक मजबूत व सुरक्षित असतील अशी ग्वाही पंतप्रधान जॉन्सन यांनी दिली आहे.

ब्रिटन व भारत या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना करोनामुळे फटका बसला असून भारताच्या गुंतवणुकीनंतर ब्रिटनमध्ये ६५०० रोजगार निर्माण होणार आहेत. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया तेथे एका आस्थापनेची निर्मिती करणार असून त्याद्वारे ही रोजगारनिर्मिती होईल.  मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांतील व्यापार क्षमता दुप्पट होणार आहे. व्यापार व गुंतवणूक योजना ब्रिटिश सरकारने जाहीर केली असून भारत ब्रिटनमध्ये ५३.३० कोटी  पौंडाची गुंतवणूक करणार असून सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया त्यातील २४ कोटी पौंडाची गुंतवणूक करणार आहे.

ही गुंतवणूक लस उद्योगात राहणार असून तेथे नवीन उद्योग व विक्री कार्यालय सुरू करणार आहेत. त्यानंतरच्या काळात १ अब्ज अमेरिकी डॉलर्सचा नवीन उद्योगही सुरू करणार आहे.

डाउनिंग स्ट्रीटने म्हटले आहे की, सीरम इन्स्टिटय़ूटच्या वतीने जी गुंतवणूक केली जाणार आहे त्यामुळे वैद्यकीय चाचण्या, संशोधन, विकास या गोष्टींना चालना मिळणार असून लशींचे उत्पादनही केले जाणार आहे. ब्रिटन भारताला ४४.६० कोटी पौंडाची निर्यात करणार असून त्यातून चारशेहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत.