कोविड १९ साथीमुळे अनेकांचे रोजगार गेले असून अतिरिक्त २०७ दशलक्ष लोक दारिद्रय़ाच्या खाईत ढकलले जाणार असून २०३० पर्यंत १ अब्ज लोक दारिद्रय़ात असतील, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे.

किमान १ अब्ज लोक २०३० पर्यंत दारिद्रय़ात दिवस कंठत असतील. यूएनडीपी व डेनव्हर विद्यापीठाचे पार्डी सेंटर फॉर इंटरनॅशनल फ्युचर्स यांच्या संयुक्त विद्यामाने कोविड साथीच्या दूरगामी परिणामांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार २७० दशलक्ष लोक दारिद्रय़ाच्या खाईत ढकलले जाणार असून दारिद्रय़ात जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या २०३० पर्यंत म्हणजे आणखी दहा वर्षांत १ अब्ज होईल. कोविड काळातील मूलभूत स्थितीचा विचार करता अलीकडचा मृत्युदर व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अर्थव्यवस्थांबाबत अलीकडे दिलेले अंदाज यावरून २०३० पर्यंत आणखी ४४ दशलक्ष अतिदारिद्रय़ात जाणार आहेत.  महिलांमधील दारिद्रय़ वाढून आणखी १०२ दशलक्ष महिला दारिद्रय़ाच्या खाईत जातील.