गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांना मारहाण करुन त्यांना तेथून पळवून लावल्याचा आरोप असलेले काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर यांचे शीर कापून आणणाऱ्याला उत्तर प्रदेशात १ कोटींचे बक्षीस जाहीर झाले आहे. ‘महाराणी पद्मावती युथ ब्रिगेड’ नामक संघटनेने यासंदर्भातील पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी लावले आहेत. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ अशा स्वरुपाचे पोस्टर हटवत समाजातील शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

स्वतःला ‘महाराणी पद्मावती युथ ब्रिगेड’चा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणवणाऱ्या भवानी ठाकूर नामक व्यक्तीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ठाकोर आणि त्यांचे कार्यकर्ते राक्षसी प्रवृत्तीचे आहेत. ज्यांनी गरीब कामगारांना मारहाण करीत डरपोकपणाचे दर्शन घडवले आहे. हे लोक देश तोडण्याचे काम करीत आहेत, याविरोधात सर्वांना एकजूट व्हावे लागेल. त्यासाठी ठाकोरचे शीर आणणाऱ्याला आम्ही १ कोटींचे बक्षीस देणार आहोत.जर ठाकोर गुजरात सोडून बाहेर जाणार नसतील तर आम्ही गुजरातमध्ये घुसून त्यांचे शीर कापून आणू असेही ठाकूरने म्हटले आहे.

दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक अजय प्रताप सिंह यांनी सांगितले की, बहराइचमध्ये अशा स्वरुपाचे पोस्टर्स लावण्यात आल्याची बाब सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याला पोलिसांनी गांभीर्याने घेतले असून असामाजिक तसेच उपद्रवी लोकांना समाजात अशांतता पसरवण्यापासून थांबवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सिंह म्हणाले, आमदार ठाकोर यांच्याबाबत करण्यात आलेल्या या टिपण्णीचे कोणत्याही प्रकारे समर्थन केले जाऊ शकत नाही. त्यामुळे असे पोस्टर हटवण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. तसेच ते लावणाऱ्यांची चौकशीही केली जात आहे.