लुधियाना : पंजाबमध्ये लुधियाना येथील मध्यवर्ती कारागृहात गुंडांच्या दोन गटांमध्ये गुरुवारी झालेल्या संघर्षांत एक कैदी ठार, तर ३५ जण जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. या गोंधळात एक वरिष्ठ पोलीस अधिकारीही जखमी झाला.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचा आदेश दिला असल्याचे सरकारी निवेदनात म्हटले आहे. दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

अमली पदार्थाच्या एका प्रकरणात खटला सुरू असलेला कारागृहातील कैदी गुरुवारी मरण पावल्यानंतर लगेच गोंधळाला सुरुवात झाली. आजारामुळे बुधवारी पतियाळा येथील रुग्णालयात पाठवण्यात आलेला सनी सूद हा मरण पावला. ही बातमी कारागृहात पोहचताच त्याच्या सहकारी कैद्यांनी इतर कैद्यांना भडकवण्यास सुरुवात केली, असे पोलीस उपायुक्त अश्वनी कपूर यांनी सांगितले.