जम्मू-पठाणकोट मार्गावर असलेल्या सुंजवा लष्करी तळावर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. त्यानंतर जम्मू शहरात रेड अॅलर्ट जारी करण्यात आला होता. या परिसरात सुरक्षा रक्षकांचा वेढाही वाढवण्यात आला असून दहशतवाद्यांविरोधात अद्यापही कारवाई सुरुच आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकांच्या कारवाईत १ दहशतवादी ठार झाला असून आपला १ जवानही जखमी झाला आहे. त्याचबरोबर शोध मोहिमेदरम्यान एका एके ४७ रायफलसह इतर हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत.


जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येते आहे. पहाटे पाच वाजता लष्करी तळावर असलेल्या स्टाफ क्वार्टरवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. यात २ जवान शहीद झाले असून एका चिमुकलीसह चार जण जखमी झाले आहेत. हा हल्ला घडवून आणणारे दोन ते तीन दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. लष्कराने पूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीमही सुरू आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, लष्कराने दहशतवाद्यांना घेरले आहे. दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार सुरूच आहे. ऑपरेशन लवकरात लवकर संपावे यासाठी उधमपूर आणि सरसवा येथून पॅरा कमांडर्संनाही पाचारण करण्यात आले आहे.