लहान मुलं खेळत असताना ते एखादी वस्तू तोंडात घालत तर नाहीत ना याकडे पालकांचं सतत लक्ष असतं. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील भोलापूर गावात एक वर्षाच्या मुलाने खेळत असताना अनावधानाने विषारी सापाचं पिल्लू गिळलं. परंतू सुदैवाने या मुलाच्या आईला वेळेतच ही गोष्ट समजल्यामुळे तिने तात्काळ तो साप मुलाच्या तोंडातून बाहेर काढला. मुल अंगणात खेळत असताना हा प्रकार घडल्याचं बोललं जातंय.

यानंतर मुलाच्या आईने आपल्या पतीच्या मदतीने स्थानिक मेडीकल सेंटरमध्ये मुलाला दाखल केलं, परंतू घडलेला प्रकार बघता मुलाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचं मत मेडीकल सेंटरमधील डॉक्टरांनी दिलं. यानंतर मुलाच्या आई-वडिलांनी तात्काळ बरेली येथील जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनीही तात्काळ या मुलावर उपचार करुन त्याला इंजेक्शन दिलं आहे. सध्या या मुलाच्या प्रकृतीला कोणताही धोका नसून खबरदारीचा उपाय म्हणून त्याला काही दिवस रुग्णालयात ठेवणार आहेत.