कर्नाटक पाठोपाठ आता गोव्यातही काँग्रेसला खिंडार पडले आहे. गोव्यातील काँग्रेसच्या १५ पैकी १० आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला आहे. आधीच कर्नाटकचा पेच सोडवतांना काँग्रेस आणि जेडीएसची दमछाक सुरू असताना आता गोव्यातील या राजकीय भूकंपामुळे काँग्रससमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्ष नेत्यासह दहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. या राजकीय भूकंपामुळे गोवा विधानसभेत भाजपा आमदारांची संख्या आता २७ झाली आहे. हे सर्व आमदार आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी भाजपात आले आहेत, त्यांनी कोणत्याही अटीशिवाय भाजपात प्रवेश केला असल्याचेही सावंत यांनी म्हटले.

प्राप्त माहितीनुसार या अगोदर गोवा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते बाबू केवलेकर यांनी बुधवारी विधानसभा अध्यक्ष माइकल लोबो यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे असे मानले जात आहे की हा गट काँग्रेसमधुन फुटून भाजपात जाणार आहे.  तर या अगोदर जून महिन्यातच गोवा भाजपा अध्यक्ष विजय तेंडूलकर यांनी देखील दावा केला होता की, काँग्रेसचे १० आमदार भाजपात प्रवेश करू इच्छित आहेत.

गोवा विधानसभेतील आमदारांची संख्या एकुण ४० आहे. त्यात आतापर्यंत भाजपा- १७, काँग्रेस -१५, जीपीएफ -३, एमजीपी -१ , एनसीपी -१ व अपक्ष -२ अस आमदारांच संख्याबळ होतं. मात्र आता काँग्रेसच्या दहा आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपा आमदारांची संख्या २७ झाली आहे.