जर तुमच्या बँक खात्यात अचानक १० कोटी रुपये जमा झाल्याचा मेसेज आला तर नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. असंच काहीसं झालं जेव्हा एक मोबाइल शॉप चालवणा-या तरुणाच्या मोबाइलवर हा मेसेज आला. आपण एका मिनिटात करोडपती झालो आहोत यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. खात्यात ९ कोटी, ९९ लाख, ९९ हजार, ९९९ रुपये जमा झालेले पाहून त्याच्या कुटुंबियांचाही आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. पण त्यांचा आनंद काही क्षणांपुरताच होता. पैसे काढण्यासाठी तरुण गेला असता अकाऊंट ब्लॉक करण्यात आल्याचं त्याला समजलं. बातमी पसरताच तरुणाच्या घरी लोकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती.

विनोद कुमार आपल्या कुटुंबासोबत जहांगीरपुरी परिसरात राहतो. घराजवळच त्याचं मोबाइल शॉप आहे. जहांगीरपुरी येथील एसबीआय ब्रांचमध्ये त्याचं बचत खातं आहे. रविवारी दुपारी जवळपास दोन वाजण्याच्या सुमारास पैसे जमा झाल्याचा मेसेज आला होता. एसएमएस पाहिल्यानंतर विनोदचा विश्वासच बसत नव्हता. एवढी मोठी रक्कम कोणी आपल्या खात्यात का जमा करेल असा प्रश्न विनोदला पडला होता. हे पैसे कुठून आले याची काहीच माहिती त्याला मिळत नव्हती. खूप वेळ त्याला कोणीतरी मस्करी करत आहे असं वाटलं. त्याने आपले मित्र इंद्रमणी तिवारी, संजय जायस्वाल, राम निवास चौधरी आणि विजय गुप्ता यांना ही माहिती दिली.

सर्वांनी त्याला एटीएममध्ये जाऊन बॅलेन्स चेक करायला सांगितलं. रविवार असल्याने बँक बंद होती. विनोदने दोन ते तीन एटीएममध्ये जाऊन तपासलं असता रविवारी दुपारी २.०८ वाजता त्याच्या खात्यात 9,99,99,999 रुपये जमा झालं असल्याचं समजलं. पण जेव्हा विनोदने पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र अकाऊंट ब्लॉक झालं होतं. सोमवारी सकाळी विनोद पासबूक घेऊन बँकेत पोहोचला, पण बँकेतील गर्दी पाहून तो बाहेरुनच निघून आला.

आपण बँक मॅनेजरला भेटून अकाऊंट अनब्लॉक करण्याची विनंती करणार असल्याचं विनोदने सांगितलं आहे. विनोदच्या खात्यात १० कोटी जमा झाल्याची माहिती आगीप्रमाणे पसरली होती, ज्यानंतर घराबाहेर लोकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती.