दिवसेंदिवस देशात वाढत असलेल्या नक्षलवादी हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दल आणि पोलिस दलाकडून कारवाई करण्यात येत आहेत. आज छत्तीसगड येथील सुकमा येथे झालेल्या कारवाईत पोलिस दलाने १० नक्षलवाद्यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त एएनआयने दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. याशिवाय कानकेर येथे केलेल्या कारवाईत नक्षलवाद्यांकडून १० भारतीय बनावटीच्या बंदूका ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

मागील काही दिवसांपासून वाढलेल्या नक्षली हल्ल्यांचा बिमोड करण्यासाठी लष्कराकडून विशेष शोधमोहीम आखली आहे. या मोहीमेत करण्यात आलेल्या कारवाईत दोन दिवसांपूर्वी बस्तर नक्षली कमांडर विलास याचा शोध घेण्यात आला होता. त्यामध्ये झालेल्या चकमकीत या कमांडरचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नक्षलवाद्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. याशिवाय सुरक्षा दलाकडून राबविण्यात आलेल्या मोहीमेत १५ नक्षलवाद्यांनाही काही दिवसांपूर्वीच ठार करण्यात आले होते.

मे महिन्याच्या सुरुवातील नक्षलवाद्यांकडून सुकमा येथे हल्ला करण्यात आला होता. यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला होता. या जवानांच्या मृतदेहांची नक्षलवाद्यांकडून विटंबना करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून त्याअंतर्गत या कारवाया करण्यात येत आहेत. यामुळे नक्षलवाद्यांवर काही प्रमाणात वचक निर्माण होण्याची शक्यता आहे.