आशियात दर दहा व्यक्तींमागे एक व्यक्ती त्यांच्या जोडीदार नसलेल्या स्त्रियांवर बलात्कार करतात. जवळच्या नातेसंबधांमध्ये तर बलात्काराचे प्रमाण त्याहूनही अधिक आहे असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे. सहा देशांतील १० हजार पुरुषांच्या अभ्यासाआधारे हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
या पाहणीत एकचतुर्थाश पुरुषांनी पत्नी किंवा मैत्रिणीवर बलात्कार केल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे जवळच्या नातेसंबंधात जास्त बलात्कार होत असल्याचे दिसून आले आहे. अशा प्रकारच्या बलात्कारांचे प्रमाण २४ टक्के असून त्यात बांगलादेशात १३ टक्के, पापुआ न्यूगिनियात ५९ टक्के प्रमाण आहे. पाहणीतील समाविष्ट लोकांपैकी एकचतुर्थाश लोकांनी बलात्कार केला असल्याचे मान्य केले. त्यातील काहींनी एकापेक्षा जास्त वेळा तसे केल्याची कबुली दिली. जानेवारी २०११ ते डिसेंबर २०१२ या काळात १०,१७८ लोकांची पाहणी करण्यात आली. त्यात आशिया व पॅसिफिकमधील सहा देशांच्या लोकांचा समावेश होता. बांगलादेश, चीन, कंबोडिया, इंडोनेशिया, पापुआ न्यूगिनिया, श्रीलंका या देशांचा त्यात समावेश होता. पापुआ न्यूगिनियात दहापैकी सहा पुरुषांनी स्त्रियांशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवल्याची कबुली दिली. बांगलादेश व श्रीलंकेत दहापैकी एकाने अशी कबुली दिली. तिथे शहरी भागात हे प्रमाण कमी आहे. कंबोडिया, चीन व इंडोनेशिया या देशांमध्ये हे प्रमाण पाचात एक किंवा पाहणीत सहभागी व्यक्तींच्या निम्मे आढळून आले. पाहणीतील ७३ टक्के पुरुषांनी लैंगिक अधिकाराच्या भावनेतून बलात्कार करीत असल्याचे सांगितले. लेखक डॉ. एम्मा फुलू यांनी बीबीसीला सांगितले, की अनेक पुरुषांना संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवणे हा त्यांचा अधिकार वाटतो. कंटाळा आल्यानंतर गमतीखातर किंवा विरंगुळय़ासाठी ते बलात्कार करतात. ३८ टक्के पुरुषांनी स्त्रियांना शिक्षा म्हणून बलात्कार केल्याचे मान्य केले. २७ टक्के लोकांनी दारूच्या अमलाखाली बलात्कार केल्याचे सांगितले. ५५ टक्के पुरुषांनी अपराधीपणाची भावना दाखवली, तर २३ टक्के लोकांना बलात्कारामुळे तुरुंगात टाकण्यात आले. ज्यांनी बालपणी हिंसाचार किंवा लैंगिक अत्याचार अनुभवला होता, त्यांचे पुढे जाऊन बलात्काराच्या कृती करण्यातील प्रमाण जास्त दिसून आले. ज्यांनी जोडीदाराव्यतिरिक्त दुसऱ्याच व्यक्तीवर बलात्कार केला त्यांनी किशोरवयीन मुलींना पहिले लक्ष्य केले. ‘लॅन्सेट ग्लोबल हेल्थ’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले.