भारतात करोना व्हायरसपासून ज्येष्ठ नागरिकांना सर्वात जास्त धोका आहे. भारतात ६० च्या पुढे वयोमान असणारी १० टक्के लोकसंख्या आहे. भारतात आतापर्यंत करोनामुळे ६० वर्षाच्या पुढच्या वयोगटात ५० टक्के मृत्यू झाले आहेत. सरकारने मंगळवारी ही माहिती दिली.

करोनासोबत अन्य आजार असणाऱ्या ७३ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अन्य देशाच्या तुलनेत भारताने करोनावर चांगल्या प्रकारे उपचार करुन मृत्यूदर कमी ठेवल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

६० ते ७४ वयोगटात आठ टक्के लोकसंख्या आहे. या वयोगटात करोनामुळे ३८ टक्के मृत्यू झाले आहेत. ७४ च्या पुढे दोन टक्के लोकसंख्या असून त्या वयोगटात १२ टक्के मृत्यू झाले आहेत. देशातील करोना व्हायरसच्या रुग्णांसंदर्भात विश्लेषण करणारी ही माहिती केंद्राने दिली आहे.

करोनामुळे आतापर्यंत ५,५९८ मृत्यू झाले आहेत. ८,१७१ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १ लाख, ९८ हजार ७०६ इतकी झाल्याचे मंगळवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले होते. “करोनामुळे जागतिक मृत्यूदर ६.१३ टक्के असताना भारतात तेच प्रमाण मृत्यूदर २.८२ टक्के आहे. वेळीच रुग्णांची ओळख पटवून त्यांना योग्य उपचार दिल्यामुळे हा मृत्यूदर कमी आहे” असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.