जम्मू-काश्मीरमध्ये लडाख येथील खारदुंग ला पास येथे बर्फाखाली दहा जण अडकले आहेत. शुक्रवारी सकाळी या भागात हिमकडा कोसळण्याची दुर्घटना घडली. घटनास्थळी बचाव मोहिम सुरु असून काही गाडया सुद्धा अडकल्याची सूत्रांची माहिती आहे. मागच्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये मोठया प्रमाणावर बर्फवृष्टी सुरु आहे.

गुरुवारी हवामान विभागाने जम्मू-काश्मीरच्या नऊ जिल्ह्यात अनंतनाग, बडगाम, बारामुल्ला, बांदीपोरा, गंदरबाल, कारगिल, कुलगाम, कुपवाडा आणि लेह या भागात हिमस्खलन होऊ शकते असा अंदाज वर्तवला होता. हिमस्खलन होण्याची शक्यता असलेल्या भागांमध्ये फिरु नका तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा करुन ठेवा असे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.

१९ ते २३ जानेवारी दरम्यान काश्मीरमध्ये पुन्हा बर्फवृष्टी होऊ शकते असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. बर्फ हटवण्यासाठी प्रशासनाने २३ मशीन्स सज्ज ठेवल्या आहेत.