जैश-ए-मोहम्मदकडे वैचारिक कल असल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या १० युवकांची पुरेशा पुराव्याअभावी सुटका करण्यात आली आहे.

सदर १० जणांपैकी चार जणांना शनिवारीच सोडण्यात आले होते. उर्वरित सहा जणांना दहशतवादापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी मानसोपचारतज्ज्ञाची मदत घेतली. इतकेच नव्हे तर यापुढे आपले पाल्य योग्य मार्गानेच चालतील अशी हमी त्यांच्या पालकांकडून घेण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाच्या विशेष दलाने दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून १३ जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर साजिद, समीर अहमद आणि शकीर अन्सारी यांना अटक करण्यात आली आणि अन्य १० जणांना चौकशीसाठी ताब्यात ठेवले होते. गरज भासेल तेव्हा चौकशीसाठी हजर राहण्याच्या हमीवर सहा जणांना सोडून देण्यात आले. आपले पाल्य यापुढे योग्य मार्गानेच चालतील, अशी हमी त्यांच्या पालकांकडून घेण्यात आली आहे, असे विशेष पोलीस आयुक्त अरविंद दीप यांनी सांगितले.