भारत युरेनियमची आयात करीत असतानाच देशातील युरेनियम उत्पादनातही १० ते १५ टक्क्य़ांची घट झाली आहे. झारखंडमधील जादूगुडा येथील खाणीत चालू असलेले काम राज्य सरकारने थांबवले असल्याने ही घट झाल्याचे सांगितले जात आहे.
अणुऊर्जा विभागाने इतर खाणींमध्ये युरेनियमचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला पण इतर ठिकाणचे युरेनियम खनिज कमी दर्जाचे असल्यामुळे उत्पादन खर्च वाढतो असे दिसून आले आहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.
जादूगुडा येथील खाणकाम बंद पडल्यानंतर युरेनियमचे उत्पादन १० ते १५ टक्के घटले आहे. पुरवठा व मागणी यात तफावत असून अणुभट्टय़ांना मिळणारे इंधनही कमी होऊ लागले आहे. एकूण २० अणुभट्टय़ा असून त्यातील १० अणुभट्टय़ांत एतद्देशीय अणुइंधन वापरले जाते व त्यात २८४० मेगावॉट ऊर्जेची निर्मिती होते, अशी माहिती भारतीय युरेनियम महामंडळ लिमिटेडचे कंपनी संदेशवहन अधिकारी पिनाकी रॉय यांनी दिली.
भारत कझाकस्तान व रशियातून युरेनियम आयात करतो. ऑस्ट्रेलियाकडून युरेनियम मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे व त्याबाबतचा करार झालेला आहे. मात्र ‘सीटीबीटी’ करारावर स्वाक्षऱ्या करण्याची तयारी भारताने न दाखवल्यामुळे अनेक देशांकडून अणू सहकार्य करण्यास विरोध होत असल्याचेही चित्र आहे.

जादूगुडा युरेनियम खाण
झारखंडमधील जादूगुडा ही युरेनियमची खाण भूमिगत आहे व १९६८ पासून ती सुरू करण्यात आली. या खाणीची खोली ३००० फूट असून देशातील सर्वात खोल खाणींपैकी ती एक आहे. रोज पाच हजार टन युरेनियम उत्पादन भारतात होते. यूसीआयएल जादूगुडा येथून रोज ७०० टन युरेनियम खनिज काढले जाते.