एक भलीमोठी क्रेन कोसळल्याने त्याखाली चिरडून ११ मजुरांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. विशाखपट्टणममधील हिंदुस्तान शिपयार्डमध्ये शनिवारी या नव्या क्रेनची काही अधिकारी आणि ऑपरेटर्स यांच्याकडून ट्रायल सुरु असताना ही दुर्घटना घडली. एएनआयने या घटनेचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

सुरुवातीला इंडियन एक्प्रेसने म्हटले होते, या भीषण दुर्घटनेत अनेक लोक सापडले आहेत. त्यापैकी १० जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यातील जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत सहा मृतदेह या क्रेनखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. डीसीपी सुरेशबाबू यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी देखील या दुर्घटनेचे काही फोटो ट्विट करीत माहिती दिली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणमच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि शहर पोलीस आयुक्तांना तातडीने यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

“शिपयार्डमध्ये नवी क्रेन दाखल झाल्याने तिची पूर्ण क्षमतेनी चाचणी सुरु होती. याचदरम्यान हा अपघात झाला. हिंदुस्तान शिपयार्ड आणि उच्चस्तरीय कमिटीकडून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे,” अशी माहिती वैझागचे जिल्हाधिकारी विनयचंद यांनी दिली.