हरयाणात सैनिक शाळेच्या प्रवेश परीक्षेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अवघ्या १० वर्षाच्या मुलाला अटक झाली आहे. अटकेत असलेला मुलगा दुसऱ्या मुलाच्या नावाने प्रवेश परीक्षा देत असताना त्याला रेवाडी येथून पोलिसांनी अटक केली. परीक्षा देणाऱ्या मुलाने उत्तर पत्रिकेवर स्वत:चे नाव टाकल्यामुळे परीक्षेत डमी बसवण्याचा हा प्रकार उघड झाला.

पेपर लिहिणाऱ्या मुलाने ज्याच्या नावाने परीक्षा देत होता त्याचे नाव टाकले तर हा प्रकार उघड झाला नसता. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांना अटक झाली आहे. मुख्य परीक्षार्थी आणि त्याच्या आई-वडिलांची पोलिसांनी अजून चौकशी केलेली नाही.
परीक्षेच्या गैरप्रकारात इतक्या लहान मुलाला अटक होण्याची हरयाणामधील ही पहिली घटना आहे. सैनिकी शाळेत प्रवेशासाठीची अखिल भारतीय प्रवेश परीक्षा रविवारी आयोजित करण्यात आली होती. रेवारीच्या सेक्टर १८ मध्ये गर्व्हमेंट गर्ल्स कॉलेजमध्ये या परीक्षेचे केंद्र होते. तिथे ही घटना घडली.

परीक्षेला सुरुवात झाल्यानंतर एका मुलाने वेगळे नाव लिहिल्याचे परीक्षकाच्या लक्षात आले. परीक्षकाने मुलाला दुसऱ्याचे नाव का लिहिले ? असा प्रश्न विचारला त्यावेळी त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्या मुलाने दिलेल्या माहितीवरुन मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकही सहभागी असल्याचे लक्षात आले. त्यांना तात्काळ तिथे बोलावण्यात आले व पोलिसांच्या हवाली केले.