देशभरात गेल्या तीन दिवसांत स्वाइन फ्लूने आणखी १०० बळी घेतले असून नवीन वर्षांतील मृतांची संख्या ५८५ झाली आहे. १२ फेब्रुवारीपासून १०० जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. आता केंद्र सरकारने निदान संच व औषधांचा साठा मागवला आहे.
स्वाईन फ्लूने १२ फेब्रुवारीपर्यंत ४८५ जणांचा मृत्यू झाला होता. देशात एकूण ८४२३ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रात स्वाइन फ्लूने सर्वाधिक लोक मरण पावले असून मृतांची अनुक्रमे संख्या १६५, १४४, ७६, ५८ झाली आहे. १५ फेब्रुवारीला राजस्थानात १२ जणांचा तर मध्य प्रदेश व गुजरातेत प्रत्येकी आठजणांचा मृत्यू झाला होता. दिल्ली व तामिळनाडूतही स्वाइन फ्लूचा संसर्ग जास्त प्रमाणात असून दोन्ही राज्यात जागरुकतेमुळे मृतांची संख्या कमी आहे. पंजाबमध्ये लागण झालेले रुग्ण व मृतांची संख्या यांचे प्रमाण जवळपास बरोबरीने आहे. ६८ जणांना एच१ एन१ विषाणूची लागण झाली होती.