कर्नाटक विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाच्या एक दिवस अगोदरच रविवारी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आपण उद्या शंभर टक्के बहुमत सिद्ध करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी हे देखील म्हटले की, काँग्रेस – जेडीएस सराकारने तयार केलेले अर्थ विधेयक देखील काहीही बदल न करत सोमवारी सभागृहात मांडले जाणार आहे.

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, ‘मी सोमवारी शंभर टक्के बहुमत सिद्ध करेन. शिवाय अर्थ विधेयक देखील तत्काळ पारीत करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर आम्ही वेतनही देऊ शकणार नाही. त्यामुळेच उद्या बहुमत सिद्ध केल्यानंतर आम्ही सर्वप्रथम या अर्थ विधेयकास हाती घेणार आहोत. मी या विधेयकात काहीच बदल केलेले नाही. मागील सरकारने ते जसे तयार केले होते, तसेच ते मी सभागृहात सादर करणार आहे’.

येडियुरप्पा यांनी शुक्रवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे व त्यांना उद्या (सोमवारी) बहुमत सिद्ध करायचे आहे. दरम्यान या अगोदर रविवारी विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी बंडखोरी करणाऱ्या काँग्रेस – जेडीएसच्या १४ आमदारांना अपात्र ठरवले. यापूर्वी देखील तीन आमदारांना अपात्र ठरवले असल्याने आता अपात्र आमदारांची संख्या १७ व विधानसभेची एकूण सदस्य संख्या २०७ झाली आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी १०४ आमदरांच्या पाठबळाची आवश्यकता असणार आहे. भाजापकडे १०५ आमदरांचे पाठबळ आहे. याबळावरच त्यांनी कुमारस्वामी यांचे सरकार पाडले होते.