उत्तराखंड येथील चमोली येथे हिमकडा कोसळून पर्वतातून वाहणाऱ्या नद्यांना आलेल्या प्रचंड पुरामध्ये १०० ते १५० जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे, अशी माहिती उत्तराखंडचे मुख्य सचिव ओमप्रकाश यांनी दिली.
100-150 casualties feared in the flash flood in Chamoli district: Uttarakhand Chief Secretary OM Prakash to ANI pic.twitter.com/JoR76lWEAb
— ANI (@ANI) February 7, 2021
चमोली जिल्ह्यातील रेणी गावाजवळ हा हिमकडा कोसळला असून आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. या जलप्रलयात अनेक ग्रामस्थांची घर वाहून गेली आहेत. धोली नदीला यामुळे मोठा पूर आला आहे. यामुळे या नदीवरील ऋषी गंगा प्रकल्पाचं मोठ नुकसान झालं आहे.
या प्रकल्पात काम करणाऱ्या सुमारे ४० ते ५० बेपत्ता मजूरांना शोधण्यासाठी शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. आयटीबीपीचे १०० पेक्षा अधिक जवान या मजुरांच्या बचावासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून एनडीआरएफची टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. हा हिमकडा चमोली येथून हृषिकेशपर्यंत पोहचणार आहे त्यामुळे जोशीमठ, श्रीनगरपर्यंत हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
जोशीमठच्या एसडीएम कुमकुम जोशी यांनी सांगितलं की, “तपोवनमध्ये एनटीपीसी आणि ऋषी गंगाचा प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. संपूर्ण नदीच चिखलात परिवर्तीत झाली आहे. हा चिखल हळूहळू वाहत आहे. चमोली, देवप्रयाग आणि सर्व नद्यांच्या किनाऱ्यावर वसलेल्या गावांच्या प्रशासनाला याची माहिती देण्यात आली आहे. तिथं काम करणाऱ्या काही लोक जखमी झाले आहेत. मात्र, किती लोक या जलप्रलयात वाहून गेले किंवा कोणाला नुकसान झालं याची नेमकी माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.”
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2021 2:09 pm