आजपासून १०० वर्षापूर्वी म्हणजेच १ नोव्हेंबर १९१८ रोजी चार वर्ष सलग सुरु असलेले महायुद्ध अखेर थांबले होते. त्याकाळी १ -२ नाही तर तब्बल ११ लाख भारतीयांनी या महायुद्धात सहभाग घेतला होता. देशासेवेसाठी आपले प्राण देणाऱ्या या सैनिकांना खऱ्या अर्थाने वंदन करण्याची वेळ आज आली आहे. सातासमुद्रापार देशाची मान ताठ करायला लावणारे कार्य करत या सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी दिली होती. यामध्ये तब्बल ७४ हजार भारतीय सैनिक शहीद झाले होते. तर ७० हजार नागरिक यामध्ये जखमी झाले होते. आज जगभरात महायुद्धाला १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने सैनिकांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भारतीय शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

हे युद्ध २८ जुलै १९१४ रोजी सुरु झाले आहे. चार वर्ष, ३ महिने आणि २ आठवडे चाललेले हे युद्ध ११ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आले. या युद्धाला सर्वात विनाशकारी युद्ध म्हणून ओळखले जाते. या युद्धआत एकूण ९० लाख सैनिकांचा आणि ७० लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता. यातील ७४ हजार सैनिक भारतीय होते. या युद्धात ३० हून अधिक देशांनी सहभाग नोंदवला होता. भारतातून एकूण १३ लाख हून अधिक लोकांना आणि १.७ लाख हून अधिक जनावरांना युद्धासाठी पाठवण्यात आले होते. भारतासाठी इतके जण युद्धात सहभागी होणे ही अतिशय आव्हानात्मक बाब होती. कारण या लोकांना युद्धासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यात आलेले नव्हते. यामध्ये विविध भाषा बोलणारे, वेगवेगळ्या प्रांतातून आलेले आणि विविध जाती-धर्माचे भारतीय लोक सहभागी होते. भारतीय सैनिकांनी दिलेल्या या योगदानाबद्दल जगभरात त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले.