देशातील जवळपास १०० तरुण आयसिस या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व तरुण आयसिसमध्ये सहभागी झाल्यावर दहशतवादी कारवायांसाठी अफगाणिस्तान, सीरिया आणि इराकला गेले आहेत. मात्र आयसिसमध्ये सामील झालेल्या तरुणांचा आकडा चिंतेचा विषय नसल्याचे सुरक्षा यंत्रणांनी म्हटले आहे. भारताची एकूण लोकसंख्या आणि त्यातील मुस्लिमांचे प्रमाण पाहता, हा आकडा चिंताजनक नसल्याचे सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात आले.

भारतातून ५० तरुण थेट आयसिसचे प्राबल्य असलेल्या देशांमध्ये गेले आहेत. तर इतर ५० तरुण आधी आयसिसचे वर्चस्व नसलेल्या भागांमध्ये गेले आणि तिथून ते आयसिसचे प्राबल्य असलेल्या भागांमध्ये पोहोचले, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली. यामधील बहुतांश तरुण सध्या आखाती देशांमध्ये आहेत. ‘भारत आणि पाश्चिमात्य देशांमधून आयसिसमध्ये दाखल झालेल्यांची संख्या अतिशय कमी आहे. यावरुन आयसिसची रणनिती अयशस्वी ठरत असल्याचे स्पष्ट होते. ग्लोबल जिहादसाठी तरुण त्यांच्या कुटुंबाला सोडून येण्यास तयार नाहीत, हेच यावरुन दिसते,’ अशी माहिती गुप्तचर यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने दिली.

देशातील १०० तरुण आयसिसमध्ये सहभागी होणे, हा आकडा देशाची एकूण लोकसंख्या पाहता अतिशय कमी आहे, असे गृह मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. ‘देशातील मुस्लिमांचे प्रमाण पाहता आयसिसमध्ये सामील झालेल्या तरुणांचा आकडा फार मोठा नाही,’ असेही या अधिकाऱ्याने म्हटले. आयसिसमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या कमी असली, तरी आयसिसच्या ऑनलाईन प्रचाराकडे आकर्षित होणाऱ्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याची कबुली या अधिकाऱ्याने दिली.

आयसिसशी संबंधित माहिती इंटरनेटवर सर्च करणाऱ्या राज्यांमध्ये केरळ पहिल्या क्रमांकावर असल्याचे केंद्र आणि राज्य सरकारच्या सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. यानंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू यासारख्या दक्षिणेकडील राज्यांचा क्रमांक लागतो. आयसिसशी संबंधित माहिती इंटरनेटवर सर्च करणाऱ्यांचे प्रमाण महाराष्ट्रातही लक्षणीय आहे.