भारतातून दरवर्षी सुमारे १ हजार प्राचीन मूर्ती चोरल्या जातात आणि त्यांची तस्करी केली जाते अशी माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या प्राचीन मूर्तींना चांगली किंमत आहे त्यामुळेच या मूर्ती भारतातील मंदिरातून चोरल्या जातात. सिंगापूर येथील शिपिंग अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. हे अधिकारी मूळचे भारतातीलच आहेत. विजय कुमार असे त्यांचे नाव असून गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत दहा हजार मूर्ती भारतातील मंदिरांमधून चोरल्या गेल्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारात विकल्या गेल्या अशी माहिती त्यांनी दिली आहे. पीटीआयशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

विजय कुमार यांचे द आयडॉल थीफ नावाचे पुस्तक नुकतेच सिंगापूरमध्ये प्रकाशित झाले त्यावेळी त्यांनी तस्करी संदर्भातली ही माहिती दिली. भारतातील मंदिरांमधून ज्या मूर्तींची तस्करी केली जाते त्या सगळ्यात देव-देवतांच्या असतात. कधी कधी त्यांचे वजन १५ ते १६ टन इतकेही असते. जहाजातून येणाऱ्या कंटेनर्समधून या मोठ्या मूर्तींची तस्करी केली जाते. बागकामासाठी, फर्निचर म्हणून अगदी सहज या मूर्ती जहाजामार्गे आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात.

अनेक वर्षांपासून भारतातून मूर्तींची तस्करी होते आहे आणि खरोखरच खेदाची बाब आहे. मात्र याबाबत म्हणावी तेवढी सजगता भारतातील अधिकारी दाखवत नाहीत. भारतीय पुरातत्त्व खातंही याबाबत काहीसं अनुत्सुक आहे. त्यामुळे अगदी सहज मौल्यवान प्राचीन मूर्तींची तस्करी केली जाते. अनेकदा तर असेही प्रकार घडले आहेत की खऱ्या मूर्तीच्या जागी तिची प्रतिकृती ठेवण्यात आली आणि खऱ्या मूर्तीची चोरी आणि मग तस्करी झाली. खऱ्या मूर्तीची नक्कल इतकी हुबेहुब केली जाते अनेकांना खऱ्या मूर्तीतला आणि प्रतिकृतीतला फरकही लक्षात येत नाही.

मोठ्या मूर्तींची जेव्हा जहाजामार्गे तस्करी केली जाते तेव्हा त्यांचे ठिकाण कायम बदलले जाते. त्या जहाजांचा मार्ग ट्रॅक होऊ नये यासाठी मुंबईहून चेन्नई, चेन्नईहून कोलकाता, कोलकाताहून हाँगकाँग, हाँगकाँगहून न्यूयॉर्क अशी ठिकाणं आणि देश बदलले जातात. तर छोट्या मूर्ती कुरियरच्या स्वरूपात पाठवल्या जातात. अमेरिका तस्करीच्या मूर्तींसाठीची मोठी बाजारपेठ आहे अशीही माहिती कुमार यांनी दिली.