‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थे’च्या (ईपीएफओ) वतीने राबविण्यात येणाऱ्या किमान मासिक निवृत्तिवेतनाची मर्यादा वाढवून एक हजार रुपये करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा योजनांसाठी दरमहा किमान मर्यादा १५ हजार रुपये करण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
‘कर्मचारी निवृत्तिवेतन योजना : १९९५’अंतर्गत केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असून, याचा फायदा तब्बल २८ लाख निवृत्तीधारकांना मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांना एक हजारपेक्षाही कमी निवृत्तिवेतन मिळत होते. ईपीएफओचे सभासद होण्यासाठी आवश्यक किमान निवृत्तिवेतन मर्यादा दरमहा १५ हजार रुपये करण्यात आली आहे. निवृत्ती नोकरदार वर्गाना याचा मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे निवृत्त झालेले तब्बल ५० हजार कर्मचारी या कक्षेत येणार आहेत, अशी माहिती ईपीएफओचे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त के. के. जालान यांनी सांगितले. ईपीएफओच्या एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयाला ३.५ लाख रुपयांची कमाल रक्कम मिळू शकेल. यापूर्वी ही रक्कम १.५६ लाख रुपये होती, अशी माहिती जालान यांनी दिली.