अमेरिकेत न्यूयॉर्क मध्ये हजारो लोक करोनाने मृत्युमुखी पडत असताना चीनने १००० व्हेन्टिलेटर्स मदत म्हणून पाठवले आहेत. ओरेगॉन येथूनही १४० व्हेन्टिलेटर्सची मदत पाठवण्यात आली असल्याचे न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्रय़ू क्युमो यांनी सांगितले. गव्हर्नरांनी रुग्णालयांना त्यांच्याकडील अतिरिक्त व्हेन्टिलेटर्स देण्याचे आवाहन केले असून त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. वापरात नसलेले २० व्हेन्टिलेटर्स नॅशनल गार्डकडे तात्पुरत्या वितरणासाठी जमा करावेत, असे आवाहन त्यांनी केले होते. न्यूयॉर्क राज्याला चीन सरकारने १००० व्हेन्टिलेटर्स पाठवले असून ते चीनचे प्रसिद्ध उद्योगपती जॅक मा व जोसेफ त्साई यांनी दिलेल्या देणग्यातून उपलब्ध करण्यात आले आहेत. ओरेगॉन राज्याकडून १४० व्हेन्टिलेटर्स न्यूयॉर्कला मिळाले आहेत. एकूण ११०० व्हेन्टिलेटर्स उपलब्ध झाल्याने थोडी आशा वाढली आहे. करोनाच्या गंभीर अवस्थेतील रुग्णांना वाचवण्यासाठी व्हेन्टिलेटर्सची गरज असते. न्यूयॉर्क राज्य हे अमेरिकेतील करोनाचे प्रमुख केंद्र झाले असून तेथे ११,३७० निश्चित रुग्ण आहेत तर ३५०० जण मरण पावले आहेत. एकूण १५ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. खासगी रुग्णालयांकडे एकूण पाचशे व्हेन्टिलेटर्स पडून असताना त्यांनी ते उपलब्ध करून दिले नाहीत. न्यूयॉर्कने सतरा हजार व्हेन्टिलेटर्सची मागणी केली आहे.