नासाच्या कॅसिनी या अवकाशयानाने शनीच्या टायटन नावाच्या चंद्रावरील सर्वात मोठा पर्वत शोधून काढला आहे. टायटन या शनीच्या चंद्रावर १० हजार ९४८ फूट उंचीचा पर्वत असून तो मिथ्रिम माँटेस पर्वतराजीत आहे. संशोधकांच्या मते या टायटनवरील सर्वात उंच शिखर हे १० हजार फुटांपेक्षा अधिक उंच आहे. ते सर्वात उंच ठिकाण आहे एवढेच नव्हे तर सर्वोच्च बिंदूही आहे, असे नासाच्या कॅसिनी रडार चमूचे स्टीफन वॉल यांनी सांगितले. टायटनवरील सर्वात उंच पर्वत हे तेथील विषुववृत्तावर आहेत. मिथ्रिम माँटेस पर्वतराजीत इतरही काही उंच पर्वत आहेत. तसेच झानाडू नावाचा एक भाग आहे. टायटनची शिखरे आपल्याला त्याच्या उत्पत्तीविषयी माहिती देतात, असे कॅसिनी मोहिमेच्या चमूतील ब्रिगहॅम यंग युनिव्हर्सिटीचे सदस्य जॅनी राडेबॉग यांनी सांगितले. पृथ्वीवरील पर्वत व सुळके हे आतून असलेल्या बलामुळे तयार झालेले दिसतात. हिमालय व अँडीज पर्वत हे अंतर्गत बलामुळे तयार झाले आहेत. कॅसिनी अवकाशयानाच्या संशोधनानुसार टायटनवर पाऊसही पडतो तेथील नद्यांच्या पाण्यामुळे पृष्ठभाग खरवडला जातो. टायटनवर मोठे पर्वत आहेत ही गोष्ट हे निदर्शित करते की, तेथील भूपृष्ठाखालीही थर आहेत ज्यांना टेक्टॉनिक प्लेट्स असे म्हणतात. टायटनचे परिभ्रमण व भरतीची दले किंवा गाभ्याचे शीतकरण अशा अनेक बाबी तेथे आहेत. तेथील बर्फाळ सागरात हे पर्वत कसे तयार झाले असावेत याचा शोध घेण्याचे काम आता संशोधकांना करावे लागणार आहे.